जुई जाधव :
Mumbai News: भारतीय जनता पक्षाने केंद्रात पुन्हा एकदा सत्ता आणण्याच्या दष्टीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. याच अनुषंगाने सध्या जोरदार हालचाली सुरु आहेत. यातच शिवसेना शिंदे गटातील काही जण ‘कमळ’ चिन्हावर लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामध्ये आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. 'आमचाच दुपट्टा लोकांना पाहिजे आहे', असे म्हणत बावनकुळे यांनी नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
'महायुती'ची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते सुनील तटकरे आणि मंत्री दादा भुसे यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. याचवेळी बावनकुळे यांनी टोला लगावला आहे. मात्र, त्यांच्या विधानाचा रोख नेमका कुणाकडे होता ? या संदर्भात आता उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विरोधी पक्षांकडून अनेकदा सांगितलं जातं की, 'महायुती'मधील दोन पक्ष म्हणजे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एकदा 'निवडणूक कमळावर लढलो तर त्यात हरकत काय', असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर चर्चांना उधाण आलं होतं.
'महायुती'च्या सरकारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असून या संदर्भात भाजपच्या नेत्यांनी अनेकदा बोलून देखील दाखवलेलं आहे. आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही हे स्पष्ट झालं. आजच्या पत्रकार परिषदेवेळी बावनकुळे यांच्या दोन्ही बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादीने नेते होते. याचवेळी त्यांनी टोला लगावत आमच्या पक्षात सर्वांना यायचं आहे, सर्वजण इच्छुक आहेत, असं म्हणत काही संकेतही दिले.
तसेच तिनही पक्षात दररोज पक्षप्रवेश होत आहेत. सर्वांना आमचा दुपट्टा पाहिजे आहे, असं सूचक विधान बावनकुळेंनी केलं. दरम्यान, बावनकुळेंच्या या विधानावर शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
(Edited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.