KDMC News : डोंबिवलीच्या राजकीय आखाड्यात भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी आता थेट डिजिटल मैदान गाठले आहे. रस्त्यांवरील खड्डे, रखडलेली विकासकामे, मैदानांचे प्रश्न आणि प्रशासनाची अनास्था यावरून सुरू असलेली राजकीय टोलेबाजी आता सोशल मीडिया पोस्ट, मीम्स आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या (AI) माध्यमातून तयार होणाऱ्या व्यंगचित्रांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, ‘कोणाचा मुद्दा भारी आणि कोणाची पोस्ट भारी?’ अशी नवी राजकीय स्पर्धाच रंगताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीपर्यंत स्थानिक प्रश्नांवरून एकमेकांवर थेट टीका करणारे भाजप आणि मनसेचे पदाधिकारी आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही आमनेसामने आले आहेत. शहरातील खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी, रखडलेली कामे, मैदानांचे प्रश्न आणि प्रशासकीय कारभार यावरून दोन्ही बाजूंकडून सवाल-जवाब सुरू आहेत. एका पक्षाकडून केलेल्या टीकेला दुसऱ्या पक्षाकडून सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले जात आहे.
या डिजिटल युद्धात AI ने मात्र राजकीय रंग अधिकच गडद केला आहे. नेत्यांचे व्यंगचित्रात्मक फोटो, राजकीय संदर्भ असलेले मजेशीर मीम्स आणि टोलेबाजी करणाऱ्या पोस्ट तयार करून त्या व्हॉट्सअॅप, फेसबुक तसेच ‘एक्स’वर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केल्या जात आहेत. काही पोस्टमध्ये विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, तर काही पोस्टमधून त्यांच्या दाव्यांची खिल्ली उडवली जात आहे.
विशेष म्हणजे, या ‘AI वॉर’ला कार्यकर्त्यांकडूनही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. पोस्ट व्हायरल होताच कमेंट्स, शेअर्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून समर्थक आपापल्या पक्षाची बाजू लावून धरत आहेत. त्यामुळे पूर्वी चौकात, सभांमध्ये आणि पत्रकार परिषदांमध्ये रंगणारा राजकीय सामना आता मोबाईलच्या स्क्रीनवर येऊन पोहोचला आहे.
डोंबिवलीच्या राजकारणात विकासाच्या मुद्द्यांबरोबरच आता ‘डिजिटल हल्ले’ही चर्चेचा विषय ठरत असून, आगामी काळात हा सोशल मीडिया वॉर आणखी रंगण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.