Eknath Shinde, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray MNS : एकनाथ शिंदेंचा पत्ता कट, राज ठाकरे होणार शिवसेनेचे प्रमुख; काय आहे भाजपचा प्रस्ताव?

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : शिवसेना-भाजपची तब्बल 25 वर्षांची युती 2019 मध्ये तुटली. त्यानंतर राज्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आपल्यासोबत असावी, यासाठी भाजपने प्रयत्न केले. मात्र, उद्धव ठाकरेंची पोकळी नेहमीच भाजपला जाणवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते. अशातच आता बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांना मनसे पक्ष महायुतीतील शिवसेनेत विलीन करण्याचा भाजपने प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. त्या शिवसेनेचे प्रमुखपदी राज यांची निवड होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळाच एकच खळबळ उडाली आहे. (MNS Merge Shivsena)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची दिल्लीत बैठक झाली. लोकसभेत राज यांनी महाराष्ट्रातील सर्व 48 जागांसाठी एनडीएचा प्रचार करावा लागणार आहे. तसेच त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत जास्त वाटा दिला जाईल, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. या चर्चेसह दिल्लीतील बैठकीत इतर बाबींवरही चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळेच राज्यातील राजकारणात भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभेत राज सोबत आले तर भाजपला राज्यात फायदा होणार आहे, यात शंका नाही. मात्र, राज ठाकरेंनी भविष्यात दीर्घकाळासाठी साथ द्यावी, या दृष्टीने भाजप प्रयत्न करताना दिसत आहे. राज ठाकरे सोबत आले तर राज्यात दोघांनाही कसा फायदा होईल, याचे गणितही बैठकीत मांडण्यात आले. त्यासाठी मनसे पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करावा लागणार आहे. त्या शिवसेनेचे अध्यक्ष होण्यास राज ठाकरे यांना भाजपश्रेष्ठींनी सूचवल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीतील चर्चेबाबत मनसेच्या (MNS) नेत्यांनी उघडपणे बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, झालेली चर्चा नाकारली नाही. राज यांना शिवसेनेच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव आल्याचे अनेक मनसे नेत्यांनी खासगीत सांगितले. भाजपसोबत जोडले गेलो तर आनंदच आहे. त्यासाठी उभय नेत्यांमध्ये आणखी काही बैठका होतील. मात्र, त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची परवानगीही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे या प्रस्तावावर आत्ताच बोलणे घाईचे होईल, असे एका मनसे नेत्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या प्रस्तावाबाबत भाजपने मुख्यमंत्री शिंदेंना संपूर्ण माहिती दिली आहे. शिवसेनेतील सर्व नेते, पदाधिकाऱ्यांची सहमती मिळवण्यासही सांगितले आहे. तसेच लोकसभेचा निकाल काहीही आला तरी मुख्यमंत्री पदावर कायम ठेवले जाईल, असा शब्दही शिंदेंना भाजपकडून दिल्याची माहिती आहे. याला मात्र शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटलांनी (Shahaji Patil) जोरदार विरोध केला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेच राहिले पाहिजेत. त्यांनी जरी तसे सांगितले तरी आम्ही त्यांना स्पष्टपणे नकार देऊ, असे पाटलांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात भाजप मनसे शिवसेनेत विलीन करण्यात यशस्वी होणार का, याकडे पाहावे लागणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT