CM Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics: मुख्यमंत्री शिंदे, अजितदादांचं टेन्शन वाढलं; राज्यात भाजप वेगळं लढणार ? 'या' मोठ्या नेत्याचा दावा

Ganesh Thombare

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. पक्षातील वरिष्ठ नेते एक-एक मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आता संपलं असून पुन्हा एकदा नेते मंडळी बैठकांचा धडाका लावणार आहेत. मात्र, अशातच महाराष्ट्रात भाजप स्वबळावर निवडणूक लढेल, अशा चर्चांनी जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत हा दावा केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिकांच्या निवडणुका भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट मिळून एकत्र निवडणुका लढवतील, असं महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. पण, जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा करत राज्यात भाजपनं एकट्यानं निवडणूक लढवावी, असा निर्णय 'आरएसएस' आणि भाजप नेत्यांच्या बैठकीत झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपूरमधील हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर 'आरएसएस' आणि भाजप यांच्यात ही महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या तीन राज्यांतील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून महाराष्ट्रात देखील भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवावी, तसेच ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांना बरोबर घेऊ नये, असं ठरल्याचा दावा आव्हाडांनी केला. आव्हाडांच्या या दाव्यावर भाजप, शिंदे गट किंवा अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे यावर त्यांची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.

जितेंद्र आव्हाडांनी 'एक्स'वर काय म्हटलं ?

'नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप-आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यांतील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले.

ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले. ज्यांना राजकारण समजते, ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही', असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या 'एक्स'वर (ट्विटर) म्हटलं आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT