Raj Thackeray  Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : काय चुकलं? काय कमी पडलं? 6 नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील!पराभवानंतर राज ठाकरेंची भावूक पोस्ट

BMC Municipal Corporation Results 2026: मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला अपेक्षित असं यश मिळालं नाही. फक्त 6 जागांवर राज ठाकरे यांना समाधान मानावे लागले आहे. महापालिका निवडणुकीत मनसेचे कामगिरी फारच असमाधानकारक आहे.

Mangesh Mahale

MNS News: महापालिका निवडणुकीत मुंबईत मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहे. मनसेला राज्यात सर्वाधिक यश हे मुंबईत मिळाले आहे. त्यानंतर कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेच्या 5 नगरसेवकांनी बाजी मारली आहे. नवी मुंबईमध्येही एक मनसैनिक निवडून आला आहे. या महापालिकांशिवाय अन्य महापालिकांमध्ये मनसेला खातेही उघडता आलेले नाही.

मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला अपेक्षित असं यश मिळालं नाही. फक्त 6 जागांवर राज ठाकरे यांना समाधान मानावे लागले आहे. महापालिका निवडणुकीत मनसेचे कामगिरी फारच असमाधानकारक आहे. अशातच मनसेचे प्रमुख अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत निकालावर भाष्य केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया! अशा शब्दात राज ठाकरेंना मनसैनिकांना बळ दिले आहे.

मनसैनिकांना राज ठाकरे काय म्हणाले...

सस्नेह जय महाराष्ट्र,

सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.

आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे.

बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच.

तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही.

लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! !

आपला नम्र

राज ठाकरे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT