Mumbai : शिवसेनेतील बंडखोरीला वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानंतर राज्यात भाजपा आणि शिवसेना यांच्या युतीचं सरकार सत्तेत आलं. बंडखोरीनंतर जवळपास वर्षभराच्या कालावधीत ठाकरे गट आणि शिंदे गटातला वाद प्रचंड टोकाला गेला आहे. तसेच दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरु असते. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलं आहे. याचवेळी 'मातोश्री'पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबईतील वांद्रे भागातील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे.
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानापासून अगदी जवळ असलेल्या शाखेवर मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी(दि.२२) मोठी कारवाई केली आहे. ठाकरे गटाच्या ऑटो चालक वेल्फेअरच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हे कार्यालय अनधिकृत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बीएमसी(BMC)कडून वांद्रे येथे कारवाई करण्यात आलेलं कार्यालय हे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांचं आहे. फारूख शेख हे या शाखेचे शाखाप्रमुख आहेत. या कार्यालयावर आता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. हे कार्यालय आता तोडण्यात येत आहे. यावेळी मुंबई महापालिकेच्या कारवाईवेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित आहेत. तसंच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही त्याठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
या कारवाई दरम्यान, हाजी हलीम खान हे वॉर्ड क्रमांक 96 चे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी या कारवाईनंतर शिवसेने(Shivsena)(शिंदे गट) वर गंभीर आरोप केले आहेत. या कारवाईआधी कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. मला शिवसेनेनं ऑफर दिली ती मी नाकारली, म्हणून महापालिकेने ही कारवाई केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण मी उद्धव ठाकरेंना कधीही सोडणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत राहिल असं खान यांनी म्हटलं आहे. तसेच 10 कोटींची ऑफर नाकारल्यामुळे ही कारवाई झाल्याचं खान यांनी म्हटलं आहे.
अरविंद सावंत काय म्हणाले..?
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत(Arvind Sawant) यांनी वांद्रे येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सावंत म्हणाले,महापालिका ज्या शाखेवर कारवाई करत आहे. ती शाखा 40 वर्षे जुनी आहे. 1995 च्या झोपड्यादेखील आपण अधिकृत केल्या आहेत. मग 40 वर्षे जुनी शाखा अनधिकृत आहे, असं महापालिका कसं म्हणू शकते? अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. गद्दार आणि मिंधे लोक सूड भावनेनं कारवाई करत आहेत. हे योग्य नाही, असंही सावंत म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.