Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

Shiv Sena UBT : ठाकरे गटाला मोठा दिलासा! दीपक सावंत यांच्या नगरसेवक पद रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

Deepak Sawant corporator disqualification case : दीपक सावंत यांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला असून, जाणून घ्या सविस्तर बातमी.

Rashmi Mane

मुंबई : शिवसेना (ठाकरे) गटाचे भांडूपमधील नगरसेवक दीपक सावंत यांना जातप्रमाणपत्र प्रकरणात दिलासा मिळाला आहे. त्यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांचे रद्द झालेले नगरसेवकपद पुन्हा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घडामोडीमुळे मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक 111 मधील राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

दीपक सावंत यांनी इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. त्यासाठी त्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, रत्नागिरी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांच्या जातप्रमाणपत्राची वैधता अमान्य करत ते अवैध ठरवले होते. या निर्णयामुळे सावंत यांच्या नगरसेवकपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

जातपडताळणी समितीच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेच्या सभागृहात दीपक सावंत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली होती. या कारवाईविरोधात सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने जातपडताळणी समितीच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नगरसेवकपदाबाबत पुढे काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या प्रकरणात भाजपच्या उमेदवार सारिका पवार यांचेही नाव चर्चेत आले आहे. प्रभाग क्रमांक 111 मधून निवडणूक लढवताना सारिका पवार यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांनीच दीपक सावंत यांच्या जातप्रमाणपत्राला आव्हान दिले होते. सावंत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर सारिका पवार यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

मात्र, न्यायालयाच्या स्थगितीच्या निर्णयामुळे या शक्यतेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. आता दीपक सावंत यांच्या नगरसेवकपदाबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया काय वळण घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. न्यायालयाच्या स्थगितीमुळे त्यांना दिलासा मिळाला असला, तरी नगरसेवकपदाच्या स्थितीबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी न्यायालयाच्या आदेशातील नेमक्या अटी आणि पुढील कार्यवाही तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मिळालेल्या या दिलाशाचा मुंबई महापालिकेतील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT