राजेंद्र त्रिमुखे
Jayant Patil News : शिंदे-फडणवीस युती सरकारमध्ये विरोधीपक्ष नेते अजित पवार जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या गटासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आणि महायुती सरकारचे उपमुख्यमंत्रीही झाले.त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे संख्याबळ जास्त असल्याने काँग्रेसचे वडेट्टीवार विरोधीपक्ष नेते झाले आहेत.14 व्या विधानसभेतील तिसरे विरोधीपक्ष नेते आहेत.
या निमित्ताने झालेल्या अभिनंदन ठरावास बोलताना जयंत पाटील आणि भास्कर जाधवयाच बरोबर एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी वडेट्टीवार यांचे कौतुक केले. अनेक राजकीय कोट्या यावेळी विधानसभेत झाल्या. "नारायण राणे शिवसेनेत असताना दोन वेळेस 1999,2004 विरोधीपक्ष नेते होते. त्यांचा कामाच्या दरारा आणि अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी याचेही", जयंत पाटलांनी कौतुक केले.
विधानसभेत बोलतांना " नारायण राणे अभ्यासपूर्ण बोलत आणि सरकारवर तुटून पडत. मात्र, त्यांनी आपल्या सदस्यांकडे नुसते वळून पाहिले तरी सर्व सदस्य क्षणात गप्प होत. असा दरारा राणेंचा होता आणि त्याला आक्रमकता आणि अभ्यासाची जोड होती", असे पाटील म्हणाले.
भास्कर जाधव यांनी काँग्रेसमध्ये असताना मधुकरराव पिचड यांच्या विरोधीपक्ष नेते पदाच्या कारकिर्दीत त्यांच्या कार्यशैली भावल्याचे सांगितले. त्यांनी त्यावेळी सभागृहात नवोदित असणारे आर.आर.पाटील, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, बबनराव पाचपुते, रायभान जाधव, माधवराव किन्हाळकर, यांच्या सारख्या आमदारांना सभागृहात बोलण्याची संधी दिली. त्यांच्यामुळे नवीन पिढी राज्याच्या राजकारणात तयार झाली असे सांगितले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सुरू झालेली राजकीय उलथापालथ चार वर्षांनंतरही सुरू आहे. या दरम्यान राज्याने दोन मुख्यमंत्री, तीन उपमुख्यमंत्री, दोन विरोधीपक्ष नेते आणि दोन विधानसभा अध्यक्ष पाहिलेत. तरीही अजून विधानपरिषद सभापतीपद शिल्लक असून यावर सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात निर्णय होऊ शकला नाही. मात्र, विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती सभागृह अध्यक्षांनी केली हे महत्वाचे आहे.
विजय वडेट्टीवार हे राज्याचे 30 वे विरोधीपक्ष नेते आहेत तर 14 व्या विधानसभेतील तिसरे विरोधीपक्ष नेते आहेत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आता वडेट्टीवार असा हा क्रम असून या विधानसभेचा अजून एक वर्षापेक्षा थोडा अधिक कालावधी शिल्लक आहे.
Edited by : Rashmi Mane