BSUP Housing Scheme Sarkarnama
मुंबई

BSUP Housing Scheme : चाव्या प्रकल्पग्रस्तांना, कब्जा भूमाफियांचा! कल्याण डोंबिवलीत चाललंय तरी काय?

Bhagyashree Pradhan

Mumbai Scam News : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात उभारलेल्या बीएसयूपी योजनेतील लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आल्यानंतर उर्वरित घरे प्रकल्पबाधितांना दिली जात आहेत. यातील 461 प्रकल्पबाधितांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकत्याच घरांच्या चाव्या देण्यात आल्या. मात्र, या घरांवर काही वर्षांपूर्वीच भूमाफियांनी कब्जा केला आहे. त्यामुळे या प्रकल्पबाधितांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

या योजनेत लाभार्थी म्हणून एक अधिकृत घर मिळाल्यानंतरही यातील अनेकांनी येथील इमारतींमधील चार-पाच घरांवर कब्जा केला आहे. अशा प्रकारे संपूर्ण इमारतीच या माफियांनी बळकावल्या आहेत. दुसरीकडे, त्यांचे पुढारीच ‘तुम्हाला या घरांतून कोणीही बाहेर काढू शकत नाही’, असे सांगत त्यांना बळ देत आहेत. त्यामुळे आता ज्या प्रकल्पबाधितांना कागदोपत्री घरांचा ताबा देण्यात आला आहे, त्यांना प्रत्यक्षात घराचा ताबा देण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. (Latest Political News)

शहरातील झोपडपट्टी तोडून त्या जागी सुसज्ज इमारती उभारण्यात आल्या. त्यानंतर या प्रकल्पबाधितांसाठी कल्याण-डोंबिवली महापालिका (Kalyan Dombvili) क्षेत्रात ‘बीएसयूपी’ योजना राबवण्यात आली होती. यातून सुरुवातीला निश्चित केलेल्या घरांची संख्या हळूहळू कमी होत गेली. सध्या प्रशासनाने सात हजार 272 घरे पूर्ण केली आहेत. यापैकी जवळपास 1500 ते 1800 झोपडीधारक लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आले. मात्र, उर्वरित नागरिक आपल्या रहिवासाचा पुरावा देऊ शकले नाहीत. यामुळे त्यांच्या नावे लाभार्थी यादीतून हटवून त्यांना ठोस पुरावे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे नागरिक घरासाठी पालिकेत फेऱ्या मारत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, राज्य सरकारने या योजनेतून उभारलेली रिक्त घरे प्रकल्पबाधितांना मोफत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मालमत्ता विभागाकडून या आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे. रिंगरोडसह 29 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पबाधितांना या योजनेतील घरांच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकत्याच देण्यात आल्या. मात्र, प्रकल्पबाधितांना देण्यात आलेल्या घरांचा मागील अनेक वर्षांपासून विनापरवानगी वापर सुरू आहे. अनेक भूमाफियांनी या घरांवर परस्पर कब्जा केला आहे. डोंबिवली पूर्वेकडील आंबेडकरनगर, पाथर्लीमधील ‘बीएसयूपी’ योजनेतील बहुतांश घरे अशा प्रकारे बळकावली गेली आहेत.

प्रशासनाला दाखवावे लागणार ‘बळ’

रस्त्यांच्या कामासाठी घरे गेल्यानंतर घरांच्या प्रतीक्षेत असलेले प्रकल्पग्रस्त घरांच्या चाव्या मिळताच घरे ताब्यात घेण्यासाठी आनंदाने पोचले. मात्र, या घरांमध्ये आधीच कब्जा असल्याचे दिसताच नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली. याबाबत त्यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाने जबरदस्तीने कब्जा केलेली घरे रिकामी करून देण्याचे आश्वासन या नागरिकांना दिले आहे. मात्र, वर्षानुवर्षे ताब्यात असलेल्या घरांमधून या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला ‘बळ’ दाखवावे लागणार हे नक्की.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT