Mumbai News, 29 Jun : मुंबईच्या भायखळ्यात मोहरम मिरवणुकीदरम्यान गोळ्या वाटप केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या फैयाज निसार हुसेन प्रेमजी याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. समाजातील मुस्लीम बांधवांना धडा शिकवण्यासाठी आपण हे कृत्य केल्याची खळबळजनक कबुली त्याने पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
फैयाज आणि त्याचा भाऊ यांना त्यांच्या पत्नींनी सोडून दिले होते. यामागे समाजातील काही लोकांचा हात असल्याचा त्याचा समज आहे. आणि याच रागातून त्याने हा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फैयाज गेल्या महिनाभरापासून या कटाची तयारी करत होता.
यासाठी त्याने मोबाईलवरून झिंक फॉस्फाईड, कॅप्सूल तयार करण्याची पद्धत आणि त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती इंटरनेटवरून मिळवली होती. त्याच्या मोबाईलमध्ये यासंदर्भातील सर्च हिस्ट्री आणि काही संशयास्पद चॅट्सही आढळून आले आहेत.
या प्रकरणात भायखळा पोलिसांनी आतापर्यंत पाच ते सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच फैयाजचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून कॅप्सूलमध्ये औषध भरण्यासाठी वापरला जाणारा ट्रेही जप्त केला आहे. या ट्रेमध्ये एकाच वेळी 100 कॅप्सूल भरता येत असल्याची माहिती आहे.
मोहरमच्या निमित्ताने भायखळा, डोंगरी, आग्रीपाडा, नागपाडा आणि मोहम्मद अली रोड परिसरात मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघतात. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या लोकांना वेदनाशामक गोळ्या असल्याचे सांगून फैयाजने या कॅप्सूल तयार केल्याचा आरोप आहे. डोंगरीतील एका हॉटेलमध्ये राहून त्याने हे काम केल्याचे तपासात समोर आले आहे.
फैयाजकडून 14 हजारांहून अधिक कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र त्याला यापेक्षा आणखी जास्त कॅप्सूल तयार करायच्या होत्या. साहित्य संपल्याने त्याला ते शक्य झाले नाही, अशी माहिती तपासातून मिळाली आहे. मोहरमच्या मिरवणुकीत तो गोळ्या वाटत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर गस्तीवरील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
काही जणांनी त्या गोळ्या घेतल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने एकच गोंधळ उडाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. फैयाज ज्या डोंगरीतील हॉटेलमध्ये गेल्या 15 दिवसांपासून राहत होता, त्याच पत्त्यावर त्याने औषधे आणि इतर साहित्य मागवले होते.
दरम्यान, फैयाज हा उच्चशिक्षित असून काही वर्षे तो इराणमध्ये राहिला होता. तेथे नोकरीसाठी गेल्यानंतर अपेक्षित काम न मिळाल्याने 2025 मध्ये तो भारतात परतला. त्यानंतर तो आपल्या वडिलांच्या रंगकामाच्या व्यवसायात भावासोबत मदत करत होता. आज फैयाजची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला माझगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.