NSE News
NSE News  Sarkarnama
मुंबई

शेअर बाजारात मोठा घोटाळा; सीबीआयची देशभरात दहा शहरांत एकाच वेळी छापेमारी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : राष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE) घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एकाच वेळी देशातील दहा शहरांत छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे. यात अनेक शेअर बाजार दलालांचा समावेश आहे. या प्रकरणी शेअर बाजाराच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) आणि माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचा सध्या तिहार कारागृहात मुक्काम आहे. (Share Market News)

सीबीआयने देशभरात दहा शहरांत एकाच वेळी कारवाई करीत हे छापे मारले. यात मुंबईत 12 ठिकाणी तर गांधीनगर, दिल्ली, नोएडा, गुडगाव आणि कोलकत्यासह इतर शहरांत छापे मारण्यात आले. प्रामुख्याने हे छापे शेअर दलालांवर मारण्यात आले. एनएसईच्या अधिकाऱ्यांकडून काही दलालांना वेळेआधीच व्यवसायाची परवानगी दिली जात होती. यामुळे चित्रा रामकृष्ण यांच्याकडे शेअर बाजाराची धुरा असताना अनेक दलालांनी मोठ्या प्रमाणात नफा कमावला होता.

या प्रकरणी चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयने 6 मार्चला अटक केली होती. सुरवातीला त्या सीबीआय कोठडीत होत्या. नंतर त्यांची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत झाली. सध्या त्या तिहार कारागृहात आहेत. रामकृष्ण यांच्यासोबत या प्रकरणी माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम यांनाही सीबीआयने अटक केली होती. या दोघांनी जामिनासाठी सीबीआय न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने या दोघांनाही दणका देत त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले होते. यामुळे दोघांचाही तिहार कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

सुरवातीला रामकृष्ण यांच्यावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. नंतर त्यांची सीबीआयने चौकशी केली होती. रामकृष्ण यांच्या भोवतीचा केंद्रीय तपास यंत्रणांनी फास आवळला होता. सीबीआयने रामकृष्ण यांच्यासह एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण आणि माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावली होती. रामकृष्ण यांच्या संपत्तीसह कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती.

या प्रकरणी ‘एनएसई’चे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम (Anand Subramanian) यांना सीबीआयने 24 फेब्रुवारीला अटक केली आहे. सीबीआयने त्यांची तीन दिवस चौकशी केली होती. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. चित्रा रामकृष्ण यांनी सांगितलेला तोच कथित योगी असल्याचेही स्पष्ट झाले होते. तोच योगी बनून चित्रा यांच्याशी ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधत होता. सुब्रह्मण्यम यांची एनएसईमध्ये नियुक्ती ही चित्रा यांनी योगीच्या सांगण्यावरून केली होती. तसेच, त्याला वेतन देतानाही अनियमितता असल्याचे चौकशीत समोर आलं होतं. (Share Market Updates)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT