मुंबई : बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास (Cabinet expansion) अखेर मुहूर्त मिळाला असून उद्या (ता. ९ ऑगस्ट) दुपारी १२ आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार आहे, त्यामध्ये शिंदे गटाचे सहा, तर भाजपचे (BJP) सहा आमदारांचा समावेश असणार आहे. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) या चार नावांना हिरवा कंदील दाखवला आहे. (Chandrakantdada,Vikhe Patil, Mungantiwar, Mahajan confirmed for the post of ministers from BJP)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीहून परतले. आज सकाळी फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार उद्याच करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार भाजपकडून चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन या चार जणांची नावे निश्चित झाली आहेत. आणखी दोन नावावर आज रात्री चर्चा होऊन उद्या दुपारपर्यंत ती नावे जाहीर होऊ शकतात.
दुसरीकडे, आगामी मुंबई महापालिका निवडणूक पाहता मुंबईतील भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांना पहिल्या यादीत स्थान मिळू शकतं. पण, त्यांचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले आशिष शेलार यांना मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण, चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाल्याने एक पद एक व्यक्तीनुसार हे पद शेलार यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, शिंदे गटाकडूनही सहा आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होणार आहे. त्यामध्ये बहुतांश मागील सरकारमधील मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे गटाकडून माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, माजी कृषीमंत्री दादा भुसे, माजी रोहयो मंत्री संदीपान भुमरे, माजी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा समावेश आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून विरोधी पक्षांकडून शिंदे-फडणवीस यांना टीकेचे धनी व्हावे लागत आहे. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेल्या टीकेनंतर घूमजाव करण्यात आले. तसेच, राज्याच्या काही भागात होत असलेली अतिवृष्टी पाहता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज असताना पालकमंत्रीच नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांनी दिल्लीवरून आल्यानंतर आज सकाळी नंदनवन बंगल्यावर एक बैठक घेतली. त्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी त्यांना दिल्लीतून पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.