Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
मुंबई

BJP Assembly Chief : विधानसभा प्रमुखांची यादी बावनकुळेंनी केली डिलीट; कारण काय?

सरकारनामा ब्यूरो

Bjp News : लोकसभेबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने (BJP) महाराष्ट्रात सुरु केली आहे. त्याचा एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्वच्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुख आज नियुक्त केले. मात्र, त्यांनी केलेले ट्वीट थोड्या वेळातच डिलीट केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राज्यातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभेच्या निवडणूक प्रमुखांच्या घोषणेचे ट्विट बावनकुळे यांनी आज दुपारी केले. मात्र, काही वेळातच विधानसभा प्रमुखांचे ते डिलीट करण्यात आले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. त्यातून काही नेमणुकांत फेरफार होण्याची शक्यता आहे.

ही निवड करताना भाजपने त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा विचार केला आहे. या प्रमुखांवर संबंधित विधानसभेतील उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी असणार आहे. अनेक ठिकाणी भाजपने निवडणूक इच्छुकांवरच जबाबदारी दिली आहे.

दरम्यान, भोसरी, चिंचवड आणि पिंपरी असे तीन विधानसभा मतदारसंघ पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आहेत. त्यांचे निवडणूक प्रमुख म्हणून अनुक्रमे विकास डोळस, काळूराम बारणे, अमित गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डोळस आणि बारणे हे माजी नगरसेवक आहेत. डोळस हे भोसरीचे भाजप आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक आहेत.

तर, गोरखे हे उच्चशिक्षित तरुण असून सध्या प्रदेश सचिव आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे ते अध्यक्ष होते. मावळ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून भाजपने मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांची नेमणूक केली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवडमधील भोसरीसह उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघ येतात. खेडचे प्रमुख तरुण माजी जिल्हा परिषद अतुल देशमुख यांना केले गेले आहे. ते ही आगामी विधानसभेचे इच्छूक आहेत. तर, आमदारकीच्या जुन्नरमधील इच्छूक आशा बुचके यांना तेथील प्रमुखपद देण्यात आले आहे. आंबेगावमध्ये ही जबाबदारी विधानसभेच्या दावेदार जयश्री पलांडे, तर शिरूरला प्रदीप कंद यांच्याकडे ती सोपिवली गेली आहे. हडपसरचे प्रमुख माजी आमदार योगेश टिळेकर यांना करण्यात आले आहे. मात्र, बावनकुळे यांनी यादी डिलीट केल्यामुळे त्यामध्ये बदल होऊ शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT