Chandrashekhar Bawankule Sarkarnama
मुंबई

Thane BJP News : 'ठाणे' काबीज करायला निघालेल्या भाजपमध्ये उफाळली गटबाजी; बावनकुळेंचा पाराच चढला

Deepak Kulkarni

राहुल क्षीरसागर

Thane News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात भाजपने तर देशात 'महाविजय'चा निर्धार करतानाच महाराष्ट्रात 'मिशन ४५'ची घोषणा केली आहे.पण याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्याच मतदारसंघ असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. हा वाद मिटत नाही तोच आता शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही भाजपमधील गटबाजी उफाळून आली आहे.

ठाणे लोकसभा प्रवास या उपक्रमांतर्गत मंगळवारी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पदाधिकाऱ्यांशी गडकरी रंगायतन येथे चर्चा करून जनतेचा कौल घेण्यासाठी रॅली काढण्यात आली. त्यानंतर चौकसभादेखील घेतली. मात्र, या चौक सभेला व गडकरी रंगायतनमधील कार्यक्रमात गर्दी न झाल्याने पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यावेळी जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याने अनेक नेत्यांनी गडकरीतील कार्यक्रमाकडेदेखील पाठ फिरविली असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे लोकसभेवर दावा करत असताना अशा पद्धतीने ठाणे भाजपमधील दोन गटांच्या गटबाजीचे बावनकुळेंना दर्शन झाले.

२०२४ लादेखील देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी(Narendra Modi) हेच असणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातून ४५ अधिक उमेदवार लोकसभेवर निवडून पाठविण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यानुसार कार्यक्रमांची आखणी व नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे लोकसभा प्रवासअंतर्गत ठाण्यात दाखल झाले होते.

या वेळी गडकरी रंगायतन येथे त्यांनी १ हजार पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर रॅली सहभागी होऊन मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु चौक सभेला गर्दी न झाल्याने त्यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. परंतु ही गर्दी का झाली नाही? याची काही महत्त्वाचे कारणे पुढे आली आहेत. जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याने अनेक पदाधिकाऱ्यांनी गडकरीतील कार्यक्रमाकडेदेखील पाठ फिरविली होती.

तर चौक सभेलादेखील तेच दिसून आले. त्यामुळे लोकसभेवर दावा करत असताना अशा पद्धतीने ठाणे भाजप(BJP)मध्ये असलेल्या दोन गटांचेदेखील बावनकुळे यांना दर्शन झाले. तसेच ठाण्यातील दौरा संपत येत असतानाही त्यांनी अशीच काहीशी नाराजी व्यक्त केल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी दिली.

दरम्यान, गडकरी रंगायतन येथे ६०० महिलांना नव्या साड्या देऊन बोलावण्यात आल्याची माहितीही भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनीच या ठिकाणी व्हायरल केली. त्यातही जुन्या पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची जराही माहिती देण्यात आली नाही, त्यांना प्रत्येक कार्यक्रमात, बैठकीत डावलले जाते. नव्याने बाहेरून आलेल्यांना पक्षात स्थान दिले जाते, असे काही गंभीर आरोप आता भाजपमधील नाराज गटाने केला आहे. त्यामुळे ठाणे भाजपमध्ये येत्या काळात जुना व नवा असा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT