Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

छगन भुजबळांनी केली महाराष्ट्रात ओबीसींची जनगणनेची मागणी

महाराष्ट्रातही ओबीसींची जनगणना करण्याची मागणी समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी केली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई - बिहार राज्यात ओबीसींची जनगणना करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसींची जनगणना करण्याची मागणी राष्ट्रावादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी केली आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारिणीची बैठक मुंबईत मंगळवारी (ता. 26) पार पडली. या प्रसंगी ते बोलत होते. ( Chhagan Bhujbal demanded a census of OBCs in Maharashtra )

छगन भुजबळ म्हणाले की, केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी अशी आमची अनेक वर्षांपासून मागणी आहे. जर केंद्र सरकार ओबीसींची जनगणना करणार नसेल तर राज्य सरकारने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जनगणना करावी, अशी मागणी त्यांनी केली. समतेचे चक्र उलटे फिरविण्याचा उद्योग सुरू झाला असून, त्याविरोधात संघर्ष करावा लागेल, असेही भुजबळ म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ओबीसींचा इम्पिरिकल डाटा मिळावा यासाठी राज्य सरकारने समर्पित आयोगाची स्थापना केली. महेश झगडे यांच्यासारखे हुशार लोक त्यात घेतले मात्र महेश झगडे एकटेच लढत होते. आयोगाने अनेकवेळा घेतलेल्या भूमिकांना देखील आमचा विरोध होता. आयोगाच्या रिपोर्टमध्ये अनेक त्रुटी देखील आहेत. मात्र त्या दुरुस्तीसाठी आता आपण प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ही महापुरुषांच्या विचारांवर चालणारी आहे. महापुरुषांचे विचार आपल्याला पसरविले पाहिजे यासाठी महापुरुषांचे विचार घेऊन प्रत्येक घरात जावा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली आणि शिवजयंती सार्वजनिकरित्या महात्मा फुले यांनी सुरू केली, दुसरी कोणीही नाही. काही लोक जाणून बुजून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. फुले - शाहू - आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या लोकांमागे आपण उभे राहिले पाहिजे आणि यासाठी महिलांनी देखील पुढाकार घ्यावा. काही लोक जाणूनबुजून चुकीचा इतिहास सांगतात. समतेचे चक्र उलटे फिरविण्याचा उद्योग आता सुरू झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

बांठिया आयोगाकडून चुकीची माहिती समोर - प्रा. हरी नरके

राज्य सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी बांठिया आयोगाची स्थापना केली होती मात्र. ह्या आयोगाने काही बाबतीत चुकीची माहिती समोर आणण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षापासूनचे पुरावे देऊन सुध्दा खोटी माहिती पसरवली गेली. आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांना बोलवून त्यांची माहिती ऑन रेकॉर्ड आणण्याचा प्रयत्न बांठिया आयोगाने केला असा आरोप विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केला. ओबीसींची संख्या जास्त असताना देखील ती जाणूनबुजून कमी दाखविण्याचा प्रयत्न आयोगाने केला, असा आरोप देखील प्रा. नरके यांनी केला.

समर्पित आयोगात ओबीसींच्या आरक्षणाला अडथळे निर्माण केले - महेश झगडे

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ओबीसी राजकीय आरक्षणासाठी झालेल्या संघर्षाची माहिती आयोगाचे सदस्य महेश झगडे यांनी यावेळी उपस्थितांना दिली. झगडे म्हणाले, ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी आयोगाची स्थापना केली गेली. मात्र त्या आयोगातील अनेक लोक आरक्षणाच्या विरोधात आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक अडथळे यात घालण्यात आले. ओबीसींची माहिती चुकीच्या पद्धतीने गोळा करण्यात आली आणि जाणूनबुजन चुकीची माहिती रिपोर्टमध्ये लिहिण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यासाठी वारंवार मी प्रयत्न केले आणि त्यामुळे हा रिपोर्ट वेळेत कोर्टात सादर झाला आणि राजकीय आरक्षण पूर्ववत झाले अशी माहिती देखील त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT