नाशिक : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. येणाऱ्या काळात पक्षसंघटना अधिक मजबुत क ण्यासाठी काम करायचे आहे. प्रत्येक तालुका, गावे, शहरात वॉर्डावॉर्डातील बूथ समित्या मजबूत करून आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा (NCP) झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. (NCp will win maximum seats in local authority elections)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज राष्ट्रवादी भवन येथे श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते म्हणाले, सत्ता असो वा नसो शरद पवार यांचे नेतृत्व अखंडितपणे उच्चस्तरावर राहील.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे,आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार सरोज आहिरे, माजी खासदार देविदास पिंगळे आदी उपस्थित होते.
श्री. भुजबळ म्हणाले की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन झाल्यानंतर चक्रीवादळ, अतिवृष्टी, महापूर, वादळ या नैसर्गिक आपत्तीतून लोक सावरत असतांना लगेच राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले. या अनेक संकटांचा सामना करत असतांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील नागरिकांचा जीव वाचविण्यासोबतच अनेक विकासाची कामे केली.
उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात कोरोनाकाळात झालेल्या कामाचे कौतुक अख्या जगभरात झाले. मालेगाव सारख्या ठिकाणी कोरोनाच्या परिस्थितीत आपण स्वतः जाऊन अनेक वेळा बैठका घेतल्या. सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर आपण मात करू शकलो. या कालावधीत साडेबारा कोटी जनतेला ५४ हजार रेशन दुकानदारांच्या माध्यमातून अन्न, धान्याचे वाटप तसेच शिवभोजनच्या माध्यमातून जनतेला मोफत अन्न पुरविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्यांनंतर आपण सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेतली. आणि आजही कुणालाही भेटण्याची आपली तयारी आहे. ओबीसींच्या आरक्षणाबाबत भाजपच्या लोकांनीच खोडा घातला केसेस दाखल केल्या आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत मध्यप्रदेशला जो निर्णय लागू झाला तो महाराष्ट्राला लागू होण्यासाठी आपले प्रयत्न सूरु असून बाठिया कमिशनचा अहवाल कोर्टात सादर केला जाणार आहे.अकरा तारखेला यावर सुनावणी होणार असून ओबीसींचे आरक्षण हे पूर्ववत होईल त्यामुळे राज्यातील ९२ नगरपरिषदा व चार नगरपंचायतीमधील निवडणुका जाहीर झालेल्या आहेत यामध्ये देखील ओबीसींना आरक्षण मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. तसेच दोन लाखांवरील अधिक कर्ज असणाऱ्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यातील जनतेला विकासाची दिशा मिळवून दिली.
यावेळी प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, माजी आमदार जयवंतराव जाधव, शिवराम झोले, डॉ. सयाजीराव गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, अॅड. शिवाजी सहाणे, सचिन पिंगळे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, शहर सरचिटणीस संजय खैरनार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.