Uddhav Thackeray and Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde On Thackeray : वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरेंवर मुख्यमंत्री शिंदेंचे जिव्हारी लागणारे वार; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : शिवसेनेतील बंडाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घरी बसून सरकार चालविणारे मुख्यमंत्री म्हणत उध्दव ठाकरेंची अनेकदा खिल्ली उडवली. मात्र, आता शिंदेनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मुलाखतीवरुनही ठाकरेंना डिवचण्याची संधी सोडली नाही. या मुलाखतीवरुन शिंदेंनी संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीला 'घरगुती मुलाखत' म्हणत खोचक टिप्पणी केली आहे. याचवेळी त्यांनी ठाकरेंच्या 'इर्शाळवाडी'वरुन भेटीवरूनही टोला लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपवरही सडकून टीका केली आहे. ठाकरेंच्या या मुलाखतीवर आता राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे. भाजप, मनसेसह शिंदे गटानेदेखील मुलाखतीवरुन ठाकरेंचा समाचार घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुलाखतीवर पहिल्यांदाच भाष्य करतानाच ठाकरेंना जोरदार चिमटे काढले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शुक्रवारी सभागृहात महत्वाच्या घोषणा करतानाच तुफान फटकेबाजीही केली. शिंदे म्हणाले, एक दोन दिवसांपूर्वी कुणीतरी मुलाखत घेतली. जाऊ दे मी त्यात पडत नाही. घरगुती मुलाखत होती. डबल इंजिनचं काम पाहून अजित पवार आमच्याबरोबर आले आहे. ट्रिपल इंजिनचं काम वेगात सुरु आहे. आम्हाला काही लोकांनी नावं ठेवली. पण आम्ही बंद पडलेली कामं सुरु केली का? आम्ही इगो वगैरे बाजूला ठेवले, इगो आणि अहंकार राज्याला मागे घेऊन जातो हे लक्षात घ्यायला पाहिजे असेही शिंदे यावेळी म्हणाले.

'वर्क फ्रॉम होम' आमच्या पद्धतीत बसत नाही...

एकनाथ शिंदे( Eknath Shinde ) यांनी विधानसभेतील आपल्या भाषणात ठाकरेंना कोंडीत पकडतानाच टीकेचे बाणही सोडले. माझं कुटुंब , माझी जबाबदारी एवढ्यापुरतं मर्यादित हे सरकार नाही. आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत. 'वर्क फ्रॉम होम' आमच्या पद्धतीत बसत नाही अशी टिप्पणी करत ठाकरेंचा बोचरा वार केला. तसेच इर्शाळवाडीची दुर्घटना झाली तेव्हा सरकार दरडग्रस्तांच्या पाठिशी सरकार उभं राहिलं आहे.

तसेच ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली, तिथल्या नागरिकांना आपण मदतीचा हात दिला. आपले सरकार हे सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांना मदत करणारे सरकार आहे असेही शिंदेंनी सभागृहात सांगितले.

काही लोक इर्शाळगडला 'व्हॅनिटी व्हॅन'मधून...

इर्शाळगड (Irshalwadi)ला दुर्घटना घडली तेव्हा मी तिथे गेलो होतो. काही लोक 'व्हॅनिटी व्हॅन'मधून आले होते. मी गेलो म्हणून मी मोठेपणा सांगत नाही. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी तेव्हा मी संपर्कात होतो. सगळे काम सुरु होते. एवढी मोठी यंत्रणा पोहचली आणि त्यांना मदत झाली. मी फक्त देखावा करायचा म्हणून गेलो नव्हतो. रस्त्यावर चिखल तुडवत आम्ही जातो. प्रकल्प बघायला जातो ही वस्तुस्थिती आहे.

जे आम्हाला नावं ठेवतात त्यांना मी हे बोलतो. काही लोकं हे वाफेचं इंजिन नाही तर नुसती त्यांच्या तोंडाचीच वाफ असते आणि बुडबुडे येतात असाही टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही विचलित होणार नाही ? असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT