CM Shinde Sarkarnama
मुंबई

CM Shinde on Viral Video : 'त्या' व्हायरल व्हिडिओवर मुख्यमंत्री शिंदेंचे स्पष्टीकरण; म्हणाले, हे खोडसाळपणाचे...

Ganesh Thombare

Mumbai News: मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. अखेर या व्हिडिओवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारने चांगली भूमिका घेतलेली असतानादेखील मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडिओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत, हे अतिशय निंदनीय असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं ?

"मराठा आरक्षणाविषयी सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद 'सोशल मीडिया'वरून चुकीच्या पद्धतीने संपादित करून फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे", असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

"मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून, कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून याविषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असताना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडिओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत, हे अतिशय निंदनीय आहे", असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

"आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याच्या कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे", असे स्पष्टीकरण शिंदे यांनी ट्विटद्वारे दिले आहे.

Edited by - Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT