Eknath Shinde News Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : विश्वास गमावलेल्या विरोधकांनी संसदेत अविश्वास ठराव मांडला; मुख्यमंत्री शिंदेंनी हिणवले

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आणि त्यावर लोकसभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मोदी सरकारविरोधातील या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली भूमिका मांडून विरोधकांना चांगलेच सुनावले.

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करत विरोधकांना चिमटा काढला. आपल्या ट्विटमध्ये शिंदे म्हणाले, देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडलाय. खरे तर या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच 'वस्त्रहरण' करून घेत आहेत.'' भारताच्या नागरिकांना आता फक्त सर्वांगीण प्रगती आणि आर्थिक विकास हवा आहे. एकमेकांचे हात हाती घेऊन ऐक्याच्या घोषणा देणारे आणि पायात पाय घालून पाडण्याची संधी शोधणारे विरोधक आता कालबाह्य झाले आहेत.

अविश्वास ठरावावर तोंडावर कसे आपटतात, हे गेल्या दोन दिवसांपासून सारा देश पाहतोय. पंतप्रधानांचे आणि 'एनडीए'च्या घटक पक्षांचे स्थान या चर्चेनंतर अधिक बळकट होईल, यात मला तीळमात्र शंका वाटत नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. विरोधकांनी आणलेल्या या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भाषणानंतर मतदान होणार आहे.

बुधवारी या प्रस्तावावर काँग्रेसच्या (Congress) वतीने बोलताना खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ''मी काही दिवसांपूर्वी मणिपूरला गेलो होतो. पण प्रधानमंत्री अजूनही गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर म्हणजे भारत नाही. मी मणिपूरबद्दल बोलतोत. मणिपूर आज वाचले नाही. त्याला तुम्ही तोडले आहे. त्याचे दोन तुकडे केले आहेत. मी मणिपूरच्या रिलिफ कॅम्पमध्ये गेलो होतो. तेथील महिलांशी बोललो तिकडच्या मुलांशी संवाद साधला."

''मणिपूरमध्ये मोदी सरकारने भारताची हत्या केली अशा शब्दांत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला सुनावले. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शाह यांनी मोदी सरकारच्या योजना आणि यूपीच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची यादी वाचली. मणिपूरमध्ये जे घडले ते लाजिरवाणे आहे, त्या मुद्यावर सरकार गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT