Devendra Fadnavis, Eknath Shinde:  Sarkarnama
मुंबई

Fadnavis - Shinde Friendship: '' आमची दोस्ती 'फेव्हिकॉल'चा जोड,कितीही प्रयत्न...''; मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना फटकारलं

सरकारनामा ब्यूरो

Palghar : शिवसेनेकडून मंगळवारी (दि.13) महाराष्ट्रातील जवळपास सर्व वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात देण्यात आली होती. त्यात'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची ही जाहिरात होती. तसेच या जाहिरातींमुळे युतीत मिठाचा खडा पडतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील चांगलेच नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंसोबत एकत्र व्यासपीठावर येणं टाळल्यानं या चर्चेला आणखी बळ मिळालं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जाहिरातीमुळे उद्भवलेल्या वादानंतर फडणवीसांच्या समोरच मोठं विधान केलं आहे.

पालघरमध्ये 'शासन आपल्या दारी योजने'चा कार्यक्रम गुरुवारी(दि.१५) आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रवीद्र चव्हाण यांच्यासह विविध भाजप व शिवसेनेचे नेतेमंडळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, आमच्या युतीत मिठाचा खडा एक वर्षापूर्वी टाकला होता,तो आम्ही फेकून दिला. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची दोस्ती आताची नाही. ते आमदार आणि मी आमदार होतो. तेव्हापासून आमची मैत्री होती. हा फेव्हिकॉलचा जोड आहे, कितीही प्रयत्न केले तरी दोस्ती तुटणार नाही असे कौतुकोद्गार शिंदे यांनी काढले.

''जय विरुची जोडी. पण...''

काही लोक म्हणतात जय विरुची जोडी. पण ही जोडी युतीची आहे. काही लोक स्वार्थासाठी एकत्र आले होते, त्यांना जनतेने दूर केले असा टोलाही आघाडीला शिंदेंनी लगावला. याचवेळी देवेंद्रजी यांच्या नेतृत्त्वात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन होता, आता पुन्हा नंबर वन झाला असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले.

शिंदे काय म्हणाले?

पालघरमध्ये 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाअंतर्गत जाहिरातीनंतरच्या वादानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस(Devendra Fadnavis) एकत्र व्यासपीठावर पोहचले. यावेळी शिंदे यांनी फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केला. शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात सुरु केलेल्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या. पण त्या योजना लोकहिताच्या होत्या. मात्र, आता डबल इंजिन सरकार सत्तेत आहे. फडणवीसांच्या अनुभवाचा फायदा मविआने करुन घेतला नाही. आता आम्ही बंद पडलेल्या योजना पुन्हा सुरु केल्या. राज्याला विकासाच्या वाटेवर आणलं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कोणाला वैयक्तिक लाभ होईल...

हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आमचं सरकार जनतेच्या दारात पोहोचतंय. आतापर्यंत 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत आमचं शासन पोहोचलं. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं, आमच्या सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सुरुवातीला आम्ही दोघेच मंत्रिमंडळात होतो. आता त्यामध्ये अनेकांचा समावेश झाला. कोणाला वैयक्तिक लाभ होईल असा एकही निर्णय घेतला नाही. सगळे निर्णय जनतेसाठी घेतले, असं मुख्यमंत्री म्हणाले.

तरूणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा...

पालघर(Palghar)मध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत रोजगार मेळावादेखील आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये अनेक स्टॉल लागलेले असून किमान दोन-तीन हजार तरूणांना रोजगार मिळण्याची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT