Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

शिंदे-फडणवीसांचा २० जिल्ह्यांना ठेंगा : विदर्भाचा मोठा बॅकलाग; पश्चिम महाराष्ट्रही कोरडा

ऋषीकेश नळगुणे

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा तब्बल ३८ दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज अखेरीस पार पडला. पहिल्या टप्यातील या विस्तारात भाजपकडून (BJP) ९ आणि शिंदे गटाकडून (Eknath Shinde) ९ अशा १८ जणांनी शपथ घेतली. या १८ नावांवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी बराच विचार विनीमय झाला असल्याचे चित्र आहे. स्थानिक राजकारण, आगामी महापालिका निवडणुका, भाजपचे विस्तारवादी धोरण, एकमेकांवर कुरघोडी अशा अनेक मुद्द्यांचा विचार करुन ही नाव अंतिम करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. (Maharashtra Cabinet Expansion news)

मात्र या सर्वांनंतरही तब्बल २० जिल्हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदापासून वंचित राहिले आहेत. यात सर्वाधिक ८ जिल्हे विदर्भातील आहेत. विदर्भामध्ये केवळ नागपूर (देवेंद्र फडणवीस) चंद्रपूर (सुधीर मुनगंटीवार), यवतमाळ (संजय राठोड) या तीनच जिल्ह्यांना मंत्रीपद मिळाले आहे. तर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम असे ८ जिल्हे मंत्रिपदापासून उपेक्षित राहिले आहेत.

मराठवाड्यामधीलही ६ जिल्ह्यांना मंत्रिपद मिळालेली नाहीत. यात नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. मराठवाड्यामध्ये सर्वाधिक ३ मंत्रिपद ही औरंगाबाद जिल्ह्याला देण्यात आली आहेत. यात संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. तर उस्मानाबादमधून भूम-परांडाचे आमदार प्रा. तानाजी सावंत यांना संधी देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet Expansion news)

उत्तर महाराष्टामध्येही धुळे जिल्हा मंत्रिपदापासून वंचित आहे. नाशिक विभागामध्ये नंदुरबार - विजयकुमार गावित, जळगाव - गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, नाशिक - दादा भुसे, अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील हे चेहरे मंत्रिमंडळात दिसून येत आहेत.

तर कोकण विभागामधून देखील ३ जिल्ह्यांना वगळण्यात आले आहे. कोकणमध्ये केवळ मुंबई शहर - मंगलप्रभात लोढा, ठाणे - एकनाथ शिंदे, रविंद्र चव्हाण, सिंधुदुर्ग - दिपक केसरकर, रत्नागिरी उदय सामंत यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. तर रायगड, पालघर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधून एकही मंत्री दिसत नाही.

एकेकाळी राज्याच्या मंत्रिमंडळात तब्बल १० ते ११ मंत्रिपद असलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्यालाही केवळ ३ मंत्रिपद आली आहेत. यात पुणे - चंद्रकांत पाटील, सातारा - शंभुराजे देसाई, सांगली - सुरेश खाडे या नावांचा समावेश आहे. तर कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमधून एकाही आमदाराला मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे पाऊस, पाण्याने समृद्ध असणारा पश्चिम महाराष्ट्र मंत्रिपदाच्या बाबतीत मात्र कोरडा ठरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT