Eknath Shinde | Gajanan Kirtikar
Eknath Shinde | Gajanan Kirtikar Shivsena
मुंबई

ठाकरे गटात चिंतेचे वातावरण; CM एकनाथ शिंदे खासदार गजानन किर्तीकरांच्या भेटीला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज ठाकरे गटातील खासदार आणि शिवसेना (Shivsena) नेते गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांची भेट घेतली. किर्तीकर यांच्या मुंबईतील निवासस्थानी जावून शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना खासदार किर्तीकर आजारी असल्याने आपण त्यांची भेट घेतली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र या भेटीत काही राजकीय चर्चा झाली असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आणि खासदार किर्तीकर यापुढे काय भूमिका घेणार यावरुन ठाकरे गटात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. (Cm Eknath Shinde meet gajanan kirtikar)

काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतील १९ पैकी १२ खासदारांनी बंड करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. या खासदारांमध्ये राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित, प्रतापराव जाधव, भावना गवळी, कृपाल तुमाने, संजय मंडलिक, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, सदाशिव लोखंडे यांचा समावेश आहे. तर अरविंद सावंत, गजानन किर्तीकर, विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय (बंडू) जाधव हे सहा खासदार ठाकरे गटासोबतच आहेत.

मात्र ठाकरे गटातील खासदार किर्तीकर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली होती. केवळ आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार मात्र, प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार, असे म्हणत खासदार गजानन किर्तीकर यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) घरचा आहेर दिला होता. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीमध्ये शिंदे आणि किर्तीकरांमध्ये काही चर्चा झाली असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. (Cm Eknath Shinde meet gajanan kirtikar)

काय म्हणाले होते खासदार गजानन किर्तीकर :

एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या २५ /१५ योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पहावयास मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही. मुंबईत नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो. मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही तो निधी मिळवितो. मात्र, ग्रामविकास किंवा इतर काही खात्याांमधील निधीची पळवापळवी केली जाते. त्यामुळे आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, तर पवार सरकार असे म्हणत, त्यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT