सचिन फुलपगारे-
Mumbai News : नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली. याप्रसंगी त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. विरोधी पक्षांकडून सरकारवर गंभीर आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि महत्त्वाचे आदेश देत तंबीही दिली.
दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. (Nanded Government Hospital News)
प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका आणि नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालयांच्या अखत्यारितील रुग्णालयांना तत्काळ भेट देऊन पाहणी करावी आणि सद्यःस्थितीचा अहवाल सादर करावा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. यापुढे जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे शासकीय रुग्णालयांना भेटी देण्याच्या स्पष्ट सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या या बैठकीला मुख्य सचिव मनोज सौनिक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी एक टीम म्हणून काम करावं, आवश्यक निधी आणि अतिरिक्त साधनसामग्रीची मागणी आल्यास ती तत्काळ पुरविण्यात यावी. मनुष्यबळ कमी असल्यास आउटसोर्सिंग करण्याचे अधिकारही जिल्हास्तरावर देण्यात आलेले आहेत. (Latest MarathI News)
त्यामुळे राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना साधनसामग्री, मनुष्यबळाअभावी विलंब झाल्यास संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल आणि औषधे, मनुष्यबळाची कमतरता ही कारणे खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.