Thackeray Group News Sarkarnama
मुंबई

Thackeray Group News : यमाच्या रेड्यावर मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री बसून मौजा मारीत आहेत; ठाकरे गटाची चौफेर टीका

Maharashtra Politics : राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार बनला आहे.

Mangesh Mahale

Mumbai : नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड येथील सरकारी रुग्णालय मृत्यू प्रकरणावरून ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारी रुग्णालयात औषधे नाहीत, डॉक्टर नाहीत यावर देवेंद्र फडणवीस का बोलत नाहीत? असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखात करण्यात आला आहे.

सरकारी रुग्णालयातील मृत्यूचे थैमान सुरूच आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. मृत्यूचे थैमान थांबण्याचे नाव घेत नाही. याला प्रशासन, आरोग्य यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप अग्रलेखात करण्यात आला आहे. सरकारी रुग्णालयातील औषध खरेदीसाठी पैसे नाहीत. यमाचा रेडाही हे चित्र पाहून रडत असेल, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

लोकांनी जगावे किंवा मरावे...

राज्यातील सरकारी रुग्णालयांत मृत्यूचे थैमान सुरू असताना सरकार निर्दयपणे राजकारणात दंग झाले आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार बनला आहे. यमाच्या रेड्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री बसून मौजा मारीत आहेत. लोकांनी जगावे किंवा मरावे, यापेक्षा आमचेच राजकारण चालावे, असे त्या रेड्यावरील स्वारांना वाटते. पुरोगामी महाराष्ट्राचे हे निर्दय आणि अमानुष चित्र आहे, अशी टीका ठाकरे गटाने सरकारवर केली आहे.

काय म्हटलं आहे अग्रलेखात...

  • देवेंद्र फडणवीस आजही तीच-तीच तीन वर्षांपूर्वीची गुळगुळीत टेप वाजवीत आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची होती, असे ते एका कार्यक्रमात पुन्हा म्हणाले. अशा ‘टेपा’ वाजवून सरकारी इस्पितळांतील मृत्यूचे तांडव थांबणार आहे काय? इस्पितळांत औषधे नाहीत, डॉक्टर नाहीत यावर फडणवीस का बोलत नाहीत?

  • छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूर येथील इस्पितळांत शंभरावर गरीब रुग्ण तडफडून मेले. त्यात लहान बालकांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. नांदेडच्या सरकारी रुग्णालयात तर हे मृत्युसत्र सुरूच आहे. मागील 24 तासांतदेखील आणखी 14 रुग्णांचा तेथे मृत्यू झाला.

  • राज्यात आमदार-खासदारांना विकत घेण्यासाठी मुबलक पैसा आहे, महाराष्ट्रात असे मृत्यूचे तांडव व नातेवाइकांचा आक्रोश सुरू असताना सरकारच्या डोळ्यांत अश्रूचे एक टिपूस नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवत बसले. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्रिपद मिळत नाही म्हणून रुसून बसले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT