Eknath Shinde and Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : "उद्धव ठाकरेंनी त्यावेळी मला सांगितलं असतं तर..."; मुख्यमंत्रि‍पदाबाबत CM शिंदेंचं मोठं विधान

Jagdish Patil

Eknath Shinde : "उद्धव ठाकरेंनी सरकार आलं त्यावेळी मला जर सांगितलं असतं की, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, तर मी माहौल तयार केला असता," असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

तसंच यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होतो तेव्हा उद्धव ठाकरे माझ्या खात्यात ढवळाढवळ करायचे असा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे आता ऐन विधानसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा सिलसिला सुरु होण्याची शक्यता आहे.

या मुलाखतीत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी गडचिरोलीचा पालकमंत्री होतो तेव्हा मला झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यास तेव्हा मुख्यमंत्रीपदावर असणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नकार दिला होता. यावेळी माझ्या विरोधात काय काय गोष्टी सुरु आहेत ते समजलं होतं. या काळात मला धमक्या आल्या होत्या.

कारण त्यावेळी नक्षलवाद्यांचा खात्मा करण्याचं काम केलं होतं. त्यावेळी माझ्या सुरक्षेत वाढ करण्याचा विषय आला होता. गृहमंत्र्यांनी झेड प्लस सुरक्षा देण्याचं ठरवलं होतं, मात्र ठाकरेंनी फोन करुन ती सुरक्षा देऊ नये सांगितल्याचं शिंदेंनी सांगितलं.

मला आणि फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न

तसंच यावेळी त्यांनी मला आणि देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा खुलासा केला. ते म्हणाले, "सुरक्षेच्या प्रकरणी मला गृहमंत्री कार्यालयातूनच फोन आला होता. त्यावेळी मला अडकवण्याचा आणि तुरुंगात धाडण्याचाही प्रयत्न झाला. माझ्यासह देवेंद्र फडणवीस यांनाही अडकवण्याचा प्रयत्न झाला. ते विरोधी पक्षनेते होते. पण मी तर उद्धव ठाकरेंच्या जवळचा होतो. त्यामुळे ते माझ्याशी असं का वागले याचं मला आश्चर्य वाटलं."

तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर

उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री व्हायचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न होतं. शिवाय मी त्यांना त्यावेळी म्हणालो होतो की, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर मला एका शब्दाने सांगायचं होतं, मी सगळा माहौल तयार केला असता, असं शिंदे म्हणाले. शिवाय तुम्ही मला मुख्यमंत्री व्हायचं नाही असं म्हणालात. नंतर म्हणला की, शरद पवारांनी सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री व्हा. पण शरद पवारही म्हणाले की हा सर्वस्वी शिवसेनेचा प्रश्न होता. असं आम्हाला त्यांच्याच लोकांनी सांगितल्याचा दावाही शिंदे यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT