Mumbai News, 05 Sep : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण (Malvan) येथील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली. यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली.
या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर सडकून टीका करत या पुतळा प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप केला. शिवाय या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे (Jaydeep Apte) हा घटना घडल्यापासून फरार होता. दरम्यान, त्याला पोलिसांनी बुधवारी (ता.04सप्टेंबर) अटक केली.
जयदीप आपटेला अटक केली, मात्र त्याचा बचाव सरकारमधील काही नेते करत असल्याचा आरोपदेखील विरोधकांकडून केला जात आहे. याच सर्व प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "जयदीप आपटेवर कठोर कारवाई केली जाईल या प्रकरणात कुणालाही सुटका नाही, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत", असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे.
आपटेला अटक करुन आम्ही विरोधकांना आम्ही चपराक लगावली असल्याचंही ते म्हणाले. "जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात दोषी असणाऱ्या कुणालाही सुटका नाही. कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. आपटेला अटक करून आम्ही विरोधकांना चपराक लगावली आहे.
जयदीप आपटेची चौकशी केली जाईल त्याच्यावर कारवाई होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर ज्यांनी राजकारण केलं तो प्रकार दुर्दैवी आहे. आम्ही आधीच सांगितलं की त्याच्यावर कारवाई होईल. छत्रपती शिवरायांच्या नावाचं जे राजकारण केलं ते दुर्दैवी होतं." अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, जयदीप आपटेला अटक झाली मात्र, त्याच्या अटकेआधीच आठ दिवस आधीपासून जामिनाची तयारी सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. ते म्हणाले, "आपटेला अटक होण्याआधी त्याच्या जामिनाची तयारी आठ दिवसांपासून सिंधुदुर्ग (Sindhudurg) कोर्टात सुरु आहे.
त्या संदर्भातील सर्व सूत्र ठाण्यातून हालत आहेत. मी वारंवार ठाण्याचा उल्लेख करतोय. तो सरेंडर होईल आणि जामिनाची तयारी करा, असे आदेश आणि कायदेशीर मदत ठाण्यातून मिळत आहे. महाराजांच्या नावाने ज्यांनी बाजार मांडला त्या षडयंत्राचे सुत्रधार ठाण्याचे आहेत." असं म्हणत नाव न घेता राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.