Nana Patole
Nana Patole Sarkarnama
मुंबई

टुक-टुक करत बसणार नाही, एकच लोहाराची मारू! आमदारांच्या नाराजीवर पटोलेंचे सूचक संकेत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : काँग्रेसमधील (Congress) वीस आमदार नाराज महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हे सर्व आमदार लवकरच दिल्लीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहे. या चर्चेमुळं सरकारमधील सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चेनं पुन्हा उचल खाल्ली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

माध्यमांशी बोलताना पटोले पक्षात कुठलीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, कुठलीही नाराजी नाही. आम्ही एक रणनीती करत आहोत. ईडीचा दुरूपयोग केंद्रातील भाजप सरकार करत आहे, त्याविरोधात रणनीती करत आहे. ते पुढील काळात कळेल. आमच्या नेत्या सोनिया गांधी काँग्रेस आमदारांना भेटायला इच्छुक असतील तर त्यात राजकीय चर्चा करणे, मत मांडणे हे होत असतं. राज्यातील महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारवर दबावतंत्र सुरू आहे.

बातम्या पेरण्याचे काम सुरू आहे. एकीकडे सांगायचं शिवसेनेत नाराजी आहे, काँग्रेसमध्ये नाराजी आहे. पण भाजपमध्ये किती नाराज आहेत, हे सांगायचं नाही. भाजपमध्ये सगळं आलबेल आहे, असं नाही. आम्ही एकच लोहाराची मारू. ह्यांच्यासारखं टुक-टुक करत बसणार आहे. आमच्याकडे सगळा मसाला तयार आहे. मी कुणासारख्या पोकळ घोषणा करत नाही. जे करेन ते दणक्यातच करेन, असा सूचक इशारा पटोले यांनी भाजपला (BJP) दिला. ही मोहिम भाजपविरोधातील आहे. आमदार आपली घरं भरायला आलेली नसतात. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आलेले असतात. त्यांच्या समस्या घेऊन ते नेत्यांकडे जातात, असंही स्पष्ट करत पटोलेंनी नाराजीची चर्चा फेटाळून लावली.

महाविकास आघाडी मजबूत

महाविकास आघाडीचे सर्व घटक मजबूत आहेत. त्यामुळे त्यांनी कितीही तपास यंत्रणांचा वापर केला तरी उपयोग होणार नाही. ज्यापध्दतीने भाजप स्वत;ची पाठ थोपटून घेत आहे. लोकशाहीत जनता मोठी असते. हे भाजपला कळायला हवे. पण वेळ निघून गेली आहे. आता जनताच त्यांना धडा शिकवेल. सत्तेचा दुरूपयोग केला जात आहे. 2014 पासून अघोषित आणीबाणी आहे. त्याविरोधात उद्रेक होणार आहे, असंही पटोले म्हणाले.

उकेंचा आवाज दाबण्यासाठी कारवाई

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी आम्ही आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात ५०० कोटींची अब्रुनुकसानीची याचिका दाखल केलेली आहे. न्यायालयाने ती याचिका दाखल केली आहे. सतिश उके हे याप्रकरणातील आमचे वकील आहेत. परंतु अचानक त्यांच्या घरावर ईडीने धाड टाकून फाईल्स, लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यात आले आहे. सतीश उके हे जस्टिस लोया यांच्या संशयास्पद मृत्यूसह इतर प्रकरणावरही काम करत आहेत. त्यांचा आवाज दाबण्यासाठीच ही कारवाई केली आहे, अशी टीका पटोलेंनी केली.

हा एकट्या सतीश उके यांचा प्रश्न नसून भाजपा सरकारच्या विरोधात कोणीही आवाज उठवला तरी त्यांचा आवाज दडपण्यासाठी ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांमार्फत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. ड्रग्जसाठी आंतरराष्ट्रीय मनी लॉंड्रिंग, फेमा, फेरा, दशतवाद्यांसाठी टेरर फंडिंग, आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांची खरेदी-विक्री करताना वापरेला पैसा, (फ्लेश ट्रेडिंग) याच्याविरोधात कारवाई करणे हा ईडी स्थापन्यामागचा मुळ उद्देश आहे. या उद्देशापासून ईडी भरकटली आहे, असंही पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT