Mumbai News, 16 Sep : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कर्नाटकमधील गणपती विसर्जनाबाबत खोटी बातमी पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कारवाईची मागणी करतानाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीने कुलाबा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देखील दाखल केली आहे. 13 सप्टेंबर रोजी बंगळुरु येथे टाऊन हॉल परिसरात विश्व हिंदू परिषदेने कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केले होते.
हे आंदोलक गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन करत होते. तर यावेळी आंदोलकांना ताब्यात घेताना गणपतीच्या मूर्तीला इजा होऊ नये, म्हणून पोलिसांनी मूर्ती सुरक्षित ठेवत आंदोलकांना ताब्यात घेतलं. एवढंच नव्हे तर त्यानंतर पोलिसांनी विधिवत पूजा अर्चना करून गणपतीबाप्पांचे विसर्जन केल्याची माहिती अनेक फॅक्ट चेक करणाऱ्या वेबसाईट्स व राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी फॅक्ट चेकच्या माध्यमातून प्रसारित केली आहे.
मात्र, आपल्या राजकीय फायद्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) या घटने संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया देताना कर्नाटक (Karnatak) सरकारने व पोलिसांनी गणपती उत्सव थांबवून गणपतीची मूर्ती जप्त केल्याचे खोटे विधान करत सणासुदीच्या काळात राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही आपल्या एक्स अकाऊंटवरून या घटनेबाबत चुकीची माहिती प्रसारित करत कर्नाटकमधील काँग्रेसला जबाबदार धरले. याशिवाय भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात खोटी माहिती पसरवून करून समाजात तेढ आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा व सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारी लेखी तक्रार प्रदेश काँग्रेसच्या विधि विभागाचे अध्यक्ष अॅड. रविप्रकाश जाधव यांनी कुलाबा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकाकडे केली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षाचे नेत्यांकडून सातत्याने खोट्या बातम्या आणि अफवा पसरवून राज्यात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांचे हे कृत्य सामाजिक शांतता भंग करणारे आहे. पोलिसांनी यांची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.