Mumbai Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील गुप्त भेटीने महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या भेटीची चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीत देखील घडामोडींनी वेग घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी अचानक भेट घेतली आहे. या भेटीनंतर पटोलेंनी शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीवरून महत्वाचं विधान करताना इशारासुध्दा दिला आहे.
काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole)यांनी उध्दव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पवारांच्या भेटीवर भाष्य केले. पटोले म्हणाले, शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत जनतेच्या मनात संभ्रम आहे. असा संभ्रम पुन्हा होता कामा नये, याबाबत स्पष्टता यावी याविषयी उद्धव ठाकरेंशी झाली. आम्ही दोघांनी निर्णय घेतला आहे की, जनतेच्या मनात महाविकास आघाडीबाबत गैरसमज निर्माण होईल, अशी बाब आम्ही कधीही सहन करणार नाही.
ठाण्यातील शासकीय रूग्णालयात १८ रूग्ण दगावल्याच्या घटनेवरून पटोलेंनी सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले,सगळ्या सरकारी हॉस्पिटल स्वतःच आजारी आहेत. पण सरकार आपलीच पाठ थोपटत असतमुख्यमंत्र्यांचे शहर असताना ही परिस्थिती आहे. संपूर्ण महाराष्ट्राची काही वेगळी अवस्था नाही.सरकारच जनतेचे हत्यारे आहेत का? या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावा लागेल. राज्य शासन दोषी आहे अशी जनतेची भावना होत असल्याचेही पटोले यावेळी म्हणाले.
बैठकीमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण
पटोले म्हणाले, शेवटी लोकशाहीत जनता ही सगळ्यात महत्त्वाची असते. आम्ही मित्रपक्ष म्हणून जेव्हा एकत्रित काम करत असतो, तेव्हा लोक आम्हाला त्याचदृष्टीने पाहत असतात. पण शरद पवार- अजित पवार यांच्या बैठकीमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. अशा गोष्टी पुन्हा होता कामा नये, याची काळजी आम्ही दोघं घेत आहोत. या विषयावर आम्ही चर्चा केली. संबंधित भेटीबाबत स्पष्टता यावी, अशी आमची भूमिका आहे. शरद पवारांच्या भूमिकेबाबतही आम्ही चिंता व्यक्त केली.
त्यात गैर काय ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील अजित पवारांसोबतच्या बैठकीबाबत पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले, अजित पवार माझा पुतण्या आहे, कुटुंबातील व्यक्तीने वडील माणसाला भेटण्यात गैर काय? ही गुप्त भेट नव्हती तर उघड होती. पण माध्यमांना काही कामधंदे नाहीत म्हणून राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाल्याचं मिश्किल अंदाजात टोला लगावला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत मोठा खुलासा केला आहे. आंबेडकर म्हणाले, जयंत पाटील यांचे एक नातेवाईक आहेत. त्यांना ईडीची नोटीस आलेली आहे. या ईडीच्या नोटीससंदर्भातली ती बैठक होती. त्याच्यापुढे काय झालं हे मला सुद्धा माहिती नाही. बैठक कशासंदर्भात होती हे मी तुम्हाला सांगितलं पण त्यात काय ठरलं हे मला माहिती नाही, असेही ते म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.