Political News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण आज पार पडले. मात्र, या सोहळ्यावर देशातील 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. नवीन संसद भवनाचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते न करता राष्ट्रपतींच्या हस्ते करावे, अशी मागणी विरोधी पक्षांची होती.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन व्हावं, अशी मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी, ठाकरे गट, आम आदमी पार्टी, तृणमुल काँग्रेस, जेडूयु, आरजेडी, डीएमके यांच्यासह अजून काही विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला.
अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण पार पडले. मात्र, यावरून आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, "ज्यावेळी हा नवीन संसद भवनाचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होत आहे. त्यावेळी या देशात एक दलित राष्ट्रपती आहे आणि कदाचित त्यांच्या पंडितांनी त्यांना सांगितले असेल की त्यांच्या हस्ते उद्घाटन करू नये", असं म्हणत वडेट्टीवारांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला.
"मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी या सरकारचे कान भरले आहेत की काय? या कार्यक्रमाला महिलांना बोलावू नका विशेषतः त्या आदिवासी आहेत त्यांना बोलावू नका आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन करू नका, म्हणूनच आदिवासी महिलेच्या हस्ते लोकार्पण सोहळा केला नसावा", असा खळबळजनक आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
"यामुळे हे मनुवादी विचारसरणीचे लोक ओबीसी आणि आदिवासी विरोधी आहेत, हे स्पष्ट झाले आहे. ही संसद इमारत नसून मनुवादी विचारसरणीला उजाळा देणारी वास्तू झाली आहे की काय? अशा प्रकारची परिस्थिती आता उद्भवली आहे", असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.