राहुल क्षीरसागर
Thane Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नुकतीच ठाणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली. त्यावेळी बोलताना शिंदेंनी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाची सुरुवात झाली पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या कामाला गती मिळाली, असे म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला होता.
शिंदे यांच्या वक्तव्यानंतर ठाणे काँग्रेसमधील पदाधिकारी देखील आक्रमक झाले आहेत.दररोजच्या तीव्र वाहतूक कोंडीत ठाणेकर नागरिक त्रस्त असताना, ठाणे काँग्रेसने फडणवीस सरकारवर थेट आरोप केला आहे की, मेट्रो प्रकल्पाचा गाजावाजा फक्त निवडणुकीसाठी केला जात आहे; प्रत्यक्षात प्रकल्प अजूनही अधूरा असून नागरिकांचा त्रास कायम आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण म्हणाले, 'फडणवीस सरकार जनतेसाठी मेट्रो चालू करण्याची तयारी न करता, फक्त प्रचारासाठी चाचणी घेत आहे, ही खरी चाचणी नाही, तर निवडणुकीसाठी राजकीय खेळ आहे.”
ठाणे काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत मेट्रो प्रकल्पाची घोषणा केली होती, तर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरूवात झाली. मात्र, आजही मेट्रो मार्गिका अपूर्ण आहेत, पिलर्स उभे नाहीत, कारशेड अर्धवट असून स्टेशन व बोगींची कामे अधूरी आहेत. मेट्रोच्या इतर सुविधांमध्ये टॉयलेट, तिकीट काउंटर, कॅफेटेरिया अजूनही उपलब्ध नाहीत.
काँग्रेसचे आरोप आहेत की, फडणवीस सरकार फक्त गाजावाजा करत आहे, प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यासाठी काहीच तयारी नाही. खर्च कोट्यवधीत वाढला असूनही नागरिकांचा त्रास कायम आहे. त्याचबरोबर, घोडबंदर रोडवरील सेवा रस्ता मध्यभागी येणार असल्याने वाहतूक कोंडी वाढेल आणि आपत्कालीन सेवा जसे फायर ब्रिगेड व ॲम्बुलन्स पोहोचणे कठीण होईल. स्थानिक नागरिकांचा विरोध असूनही महापालिकेने सेवा रस्त्याचे एकत्रीकरण सुरू ठेवले आहे.
स्व. काँग्रेस नेते बाळकृष्ण पुर्णेकर यांनी सातत्याने नागरिकांसाठी सेवा रस्त्याची मागणी केली, तरीही सरकारने जनतेचा विश्वास न घेता काम सुरू ठेवले. विक्रांत चव्हाण यांनी ठाणेकरांना इशारा दिला की, "जर सरकारने सेवा रस्ता एकत्रीकरण तातडीने थांबवले नाही आणि मेट्रोबाबत स्पष्ट श्वेतपत्रिका जारी केली नाही, तर काँग्रेस जनहित याचिका दाखल करेल आणि मोठे जनआंदोलन उभारेल." ठाणेकरांसाठी वाहतूक कोंडी कमी करण्याचे फक्त प्रचाराचे आश्वासन देणे, आणि प्रत्यक्षात काम पूर्ण न करणे हे फडणवीस सरकारच्या धिम्या धोरणाचे स्पष्ट उदाहरण आहे. या पत्रकार परिषदेस ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे,हिंदुराव गळवे, रवी कोळी उपस्थित होते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.