Nana Patole
Nana Patole Sarkarnama
मुंबई

'अग्निपथ' विरोधात काँग्रेस पेटविणार आंदोलनाची मशाल : नाना पटोले म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

मुंबई - केंद्र सरकारने देशातील सैन्य भरतीसाठी 'अग्निपथ' ही योजना आणली आहे. या योजनेचा देशभरातील बेरोजगार युवकांनी विरोध सुरू केला आहे. अशातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनेही या योजनेच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. या आंदोलनाची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ( Congress to light torch of agitation against 'Agneepath': Patole says this scheme is dangerous for army and youth )

नाना पटोले म्हणाले, "केंद्रातील मोदी सरकारने सैन्य भरतीसाठी आणलेली ‘अग्निपथ’ ही योजना सैन्यात कंत्राटी पद्धत लागू करणारी आहे. केवळ चार वर्षांची सेवा करून तरुणांना परत बेरोजगारीत ढकलण्याचा हा डाव आहे. लष्करी सेवेत भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धाडसी तरुणांच्या भवितव्याशी भाजपा सरकारने खेळ मांडला आहे," असा आरोप यावेळी यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, "काँग्रेस पक्षाचा ‘अग्निपथ’ योजनेला विरोध आहे. तरुणांच्या व देशाच्या हितासाठी सोमवारी ( ता. 27 ) राज्यभर या योजनेविरोधात तीव्र आंदोलन केले जाणार आहे," अशी माहिती पटोले यांनी दिली.

"केंद्र सरकारने आणलेली ‘अग्निपथ’ योजना ही चार वर्षांची सेवा करून तरुणांना पुन्हा वाऱ्यावर सोडून देणारी आहे. चार वर्षे लष्करी सेवेत कर्तव्य बजावलेल्या जवानांना ऐन उमेदीच्या काळात उघड्यावर सोडून देणे हा त्यांचा अपमान करणारे आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर या अग्निविरांना भाजप कार्यालयात चौकीदाराची नोकरी देऊ, असे विधान भाजपचे नेते करत आहेत. यातूनच भाजपचे जवानांबद्दलचे बेगडी प्रेम दिसून देते. देशसेवा करणाऱ्या जवानांचा अपमान आम्ही कदापि खपवून घेणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

"सैन्यदलात केवळ चार वर्षांची सेवा म्हणजे देशाच्या सुरक्षेशी केलेली तडजोड असून हा देशद्रोहच आहे. तरुणांच्या भवितव्याशी केंद्र सरकारने खेळ चालवलेला असून याबद्दल भाजप सरकारने देशाची माफी मागावी. अग्निपथच्या नावाखाली कंत्राटी लष्कर भरती करण्याला काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी," अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

"काँग्रेस पक्ष सोमवारी (ता. 27) सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात धरणे आंदोलन करुन ‘अग्निपथ’ योजनेचा फोलपणा चव्हाट्यावर आणेल. या आंदोलनात पक्षाचे आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी, सर्व सेल व फ्रंटचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्याने सहभागी होऊन अग्निपथ योजनेला विरोध करतील. काँग्रेस पक्ष तरुणांच्या सोबत असून अग्निपथ योजना मागे घेईपर्यंत काँग्रेस लढा देत राहील," असेही नाना पटोले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT