Congress Jansamvad Yatra  Sarkarnama
मुंबई

Congress Jansamvad Yatra : काँग्रेसची राज्यात तीन सप्टेंबरपासून जनसंवाद यात्रा

Maharashtra Politics : या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून या दोन्ही सरकारच्या चुकीच्या कामांचा पर्दाफाश करण्यात येणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या धोरणांचा पदार्फाश करण्यासाठी महाराष्ट्रात येत्या ३ सप्टेंबरपासून काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा राज्यातील सर्व खेड्यापाड्यात जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची माहिती दिली. (Congress's Jansamvad Yatra in the state from September 3)

काँग्रेसची ही जनसंवाद यात्रा प्रत्येक विभागातील नेत्यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे. त्यात मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उत्तर महाराष्ट्रात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पश्चिम विदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली पूर्व विदर्भात ही यात्रा निघणार आहे. ही यात्रा गावे खेडी, तालुका आणि शहरातून जाणार आहे.

नाना पटोले म्हणाले की, भाजपचे केंद्रातील मोदी सरकार आणि आणि राज्यातील येड्याचे ((EDA) सरकार हे सर्वसामान्यांची लूट करीत आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनतेचे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जीवन जगणं कठीण झाले आहे. भाजप केवळ सत्तेसाठी काम करत आहे. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून या दोन्ही सरकारच्या चुकीच्या कामांचा पर्दाफाश करण्यात येणार आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, ऐन ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके हातची गेली आहेत. चारा आणि पाण्याची टंचाई संपूर्ण महाराष्ट्रात जाणवत आहे. काही भागातून पाणी टॅंकरची मागणी होत आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे त्याकडे लक्ष नाही. त्यामुळे राज्यात सरकार आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारल्याने कांद्याचे भाव पडले. त्यावर केंद्राने नाफेडच्या माध्यमातून दोन लाख टन २४१० रुपये दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. कांदा खरेदीसाठी नाफेडने अनेक अटी घातल्या आहेत. याशिवाय फक्त नाशिक जिल्ह्यात १५ लाख टनांपेक्षा जास्त कांदा उत्पादन होते. मग, राज्यातील कांद्याचे करायचे का, असा सवालही थोरात यांनी उपस्थित केला.

या वेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT