Amit Thackeray Backed Aditya Thackeray: राजकीय अपरिहार्यतेतून का होईना पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र आले. केवळ ते एकटेच नाही तर ही दोन्ही कुटुंब एकत्र आली. ठाकरे कुटुंबियांची पुढची पिढी म्हणजे आमदार आदित्य ठाकरे आणि राजपुत्र अमित ठाकरे. या दोघांमध्येही अनेकदा चांगला समन्वय दिसून आला आहे. आपल्यापेक्षा वयानं लहान चुलत भाऊ म्हणून आदित्य ठाकरेंनी अमित ठाकरेंना जाहीर कार्यक्रमांमध्ये अनेकदा सावरुन घेतलं आहे. पण आता दिशा सालियान प्रकरणामुळं अडचणीत आलेले आदित्य ठाकरे यांच्या पाठिशी अमित ठाकरे खंबीरपणे उभे असल्याचं दिसून आलं आहे. याप्रकरणी अमित ठाकरेंनी सडेतोड भाष्य केलं आहे.
दिशा सालियान प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडं आला असून दिशा सालियानच्या वडिलांच्या मागणीनुसार, कोर्टानं याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. त्यानुसार, सीबीआयनं अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवला आहे. पण काही राजकीय नेत्यांकडून वारंवार आदित्य ठाकरेंचं नाव या प्रकरणात घेतलं जात असल्यानं यावर खुद्द आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी स्पष्टीकरण दिलं होतं.
पत्रकारांशी संवाद साधताना जेव्हा अमित ठाकरेंना आदित्य ठाकरेंच्या दिशा सालियान प्रकरणाशी नाव जोडलं जात असल्याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी म्हटलं की, लोक या प्रकरणाकडं कशा पद्धतीनं पाहतात हे मला माहिती नाही. पण एक भाऊ म्हणून मी खात्रीनं सांगतो की, आदित्य ठाकरे असं करुच शकत नाहीत, त्यांची या प्रकरणात कुठलीही भूमिका असूच शकत नाही.
आपण दिशा सालियान हीला कधी भेटलो नाही आणि तिला ओळखतही नसल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. कुठल्याही ठोस पुराव्यांशिवाय आपले राजकीय विरोधक गेल्या सहा वर्षांपासून आपलं चारित्र्यहनन करत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. खोट्या आरोपांद्वारे आपली प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न होत असले तरी सत्याला लढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. यापार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या ठाम भूमिकेमुळं आदित्य ठाकरेंना कुटुंबियांकडून भक्कम पाठिंबा असल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी मॅनेजर असलेल्या दिशा सालियानं हीचा ८ जून २०२० रोजी मालाडमधील एका उंच इमारतीवरुन १२ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला, यामध्ये त्यांना कुठलंही कट-कारस्थान असल्याचं दिसून आलं नाही. त्यामुळं यामध्ये कोणावरही एफआयआर नोंदवण्यात आला नव्हता. तर ही आपघाती मृत्यूचं प्रकरण असल्याचं सांगत तपास करुन दिशानं आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांनी काढला होता. अखेर या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट कोर्टात सादर केला आणि याची फाईल बंद केली होती.
पण याप्रकरणात दिशा सालियानच्या वडिलांनी पुन्हा कोर्टात धाव घेतल्यानं कोर्टानं याचा तपास पुन्हा सुरु करुन सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडं सोपवला आणि एफआयआर दाखल करण्याचे आदेशही दिले. त्यानुसार, सीबीआयनं यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.