Devendra Fadnavis-Eknath Shinde-Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : तुमच्यावर टीका करतो; म्हणून आम्हाला शत्रू समजता का? : घराची रेकी होताच राऊत संतापले

MP Sanjay Raut's house's Reiki : मला 1991 पासून सामनाचा संपादक म्हणून सुरक्षा राहिलेली आहे. सामना हा कायम हिटलिस्टवर राहिलेले वृत्तपत्र आहे. केंद्राकडून त्या संदर्भात काही सूचना होत्या, शिवसेनेचा नेता खासदार म्हणून सुरक्षा व्यवस्था असते.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 20 December : आमच्या घरावर पाळत ठेवली जात आहे, हे आमच्यासाठी नवीन नाही. आम्हाला मारण्याचा प्रयत्न अनेकदा झाला आहे. माझा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. आमचे मुंबईचे पोलिस सक्षम आहेत. मी आत्ताच आलो आहे आणि पोलिसांनी सकाळपासून त्या संदर्भात तपास सुरू केला आहे. पण, राजकारणात आम्ही आपल्यावर टीका करतो, भूमिका मांडतो म्हणून तुम्ही आम्हाला शत्रू समजता आणि शत्रू समजता म्हणून, ‘तुमच्या जीवितास धोका निर्माण झाला तरी आम्हाला परवा नाही, या टोकापर्यंत तुम्ही येता का,’ असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घराची दोघांनी नुकतीच रेकी केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले, राज्यात अडीच वर्षांपूर्वी नवीन सरकार जेव्हा आलं, अडीच तीन वर्षांत त्यानंतर सर्व राजकीय विरोधाची सुरक्षा काढून घेण्यात आली. सरकार बदललं असेल तरी सगळ्यांची सुरक्षा व्यवस्था काढणे हा अत्यंत निर्घृण प्रकार आहे. राजकीय सूडाचा प्रकार आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अशा प्रकारचा निर्णय कधी घेण्यात आला नाही. मला 1991 पासून सामनाचा संपादक म्हणून सुरक्षा (Security) राहिलेली आहे. सामना हा कायम हिटलिस्टवर राहिलेले वृत्तपत्र आहे. केंद्राकडून त्या संदर्भात काही सूचना होत्या, शिवसेनेचा नेता खासदार म्हणून सुरक्षा व्यवस्था असते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, गृहमंत्री फडणवीस झाले. आम्ही तुमच्यावर टीका करतो म्हणून तुम्ही आम्हाला शत्रू समजता का. महाराष्ट्रात अशा प्रकारचं राजकारण कधीही झालं नाही, असेही राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, बाबा सिद्दिकी यांच्यासारख्या नेत्याची हत्या झाली. बीडमध्ये संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झाली. परभणीत काही प्रकार झाल. महाराष्ट्रातलं वातावरण अधिक बिघडवण्यासाठी काही लोका प्रयत्न करत आहेत. काही फोर्सेस प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस नक्षलवादी नक्षलवादी अशी बोंब सकाळपासून मारत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये नक्षलवादी होते, असा आरोप करतात. नक्षलवाद्यांचं कार्यक्षेत्र वेगळं आहे आणि त्यांचा बीमोड झालेला आहे, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.

नक्षलवाद्यांपेक्षाही तुमच्या अवतीभोवती जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांच्यापासून समाजाला जास्त धोका आहे. हे बीडच्या प्रकरणात दिसून आले. सरकारमध्ये सामील झालेले मुख्यमंत्र्यांच्या सभोवताली असलेले, गृहमंत्र्यांच्या बरोबर असलेले, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर असलेले काही फोर्सेस आहेत, त्यांच्यामुळे या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडत आहे, असा आरोपही राऊतांनी केला.

राऊत म्हणाले, बहुतेक या राज्यातल्या शासन प्रमुखांची अशी इच्छा दिसत आहे, जे आमच्याविरुद्ध बोलत आहेत, आम्हाला विरोध करत आहेत, त्यांना गुंड टोळ्यांपासून जर काही त्रास झाला, त्याला बहुतेक सरकारची मुखसंमती दिसते, असं मला या राज्यातलं घटनांवरून दिसत आहे. या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. सरकार पुरस्कृत झुंडशाही, गुंडगिरी आणि सुपारी हे सरकार पुरस्कृत सुरू आहे

मी फार जपून शब्द वापरतो, मी शब्द वापरले की राज्याचे मुख्यमंत्री घायाळ होतात आणि मग ते आमच्यावर टीका करतात. त्यांचं म्हणणं आहे आम्ही वातावरण खराब करतो. तुम्ही राज्याची सूत्रे हातात घेतल्यापासून या राज्याचं वातावरण किती खराब झालं आहे, या संदर्भात तुम्ही आत्मचिंतन आणि मंथन केलं पाहिजे.

मी नुसतं बोलत नाही, कामही करत आहे. माझ्या पक्षाचे काम करत आहे, त्यानंतर या महाराष्ट्रातील आणि देशात धर्माचे जातीवादी फोर्सेस निर्माण झाले आहेत, ज्यांना या देशात तुकडे करायचे आहेत, पेटवापेटवी करायची आहे अशा घटनांच्या विरुद्ध संजय राऊत आणि आमचे सहकारी हे सगळे काम करत आहेत. त्याचा त्रास अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना होत असेल तर माझा नाइलाज आहे, असा इशाराही राऊतांनी दिला.

महाराष्ट्रात गुंडांना सुरक्षा आहे. भारतीय जनता पक्षाचे किंवा शिंदे गटाचे अजित पवार गटाचे असंख्य लोक आहेत, त्यांच्या मागे पुढे चार चार बंदूकधारी पोलिस आहेत. या राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, त्याचं कारण पोलिसांचं बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था आहे, हे सरकारला मदत करणाऱ्या गुंडांच्या सेवेत आहे

आमच्या पक्षप्रमुखांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून नागपुरात विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. आमचे जे प्रमुख नेते आहेत, भास्कर जाधव आणि अनिल परब यांनी सभागृहात हा विषय चर्चेला आणला आहे. मला उद्धव ठाकरेंच फोन आला होता. आदित्य ठाकरेहे सीएमकडे आमदारांसह भेटायला गेले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT