Devendra Fadnavis and Amit shah  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : मोठी बातमी ! गृहमंत्री अमित शाहांची उपमुख्यमंत्री फडणवीस भेट घेणार

Devendra Fadnavis Meets Amit shah : गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत काय चर्चा होणार ?

Ganesh Thombare

Delhi News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी रात्री भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील परिस्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवरच केंद्रीय गृहमंत्री शाह आणि गृहमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. (Devendra Fadnavis Meets Amit shah)

याबरोबरच राज्यसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे. जवळपास 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार असून यामध्ये 56 जागांपैकी महाराष्ट्रातील सहा जागा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून राज्यसभेवर कोणाची वर्णी लागते, कोणाला राज्यसभेवर पाठवण्यात येते, याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. अनेकांची नाव चर्चेत देखील आहेत. त्यामुळे गृहमंत्री शाह आणि फडणवीस यांच्या या भेटीत राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसंदर्भात विचारमंथन होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस स्टेशनमध्येच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला होता. आता ही घटना ताजी असतानाच मुंबईच्या दहिसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येची घटना घडली.

याआधी पुण्यात भरदिवसा गँगस्टर शरद मोहोळची हत्या झाली. महाराष्ट्रात मागील काही दिवसांत अनेक गोळीबाराच्या घटना घडल्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकार अपयशी ठरल्याची टीका होत आहे. तसेच ठाकरे गटाकडून तर फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यातच सध्या राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. तर लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री शाह हे गृहमंत्री फडणवीस यांच्याकडून आढावा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT