Mumbai News : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप आज वाजणार आहे. मात्र, अद्यापही विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची रिकामीच आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे. त्यावर निर्णय होत नसल्याने विरोधकांची घालमेल वाढली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधानसभेत यावर भाष्य केले.
विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचे अभिनंदन करताना जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दाही उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांशी संवाद ठेवणार असल्याची आठवण करून देत पाटील यांनी उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून टोला लगावला. उपाध्यक्षांच्या निवडणुकीत संवाद दिसला असता तर त्यांचे वाक्य खरे ठरले असते, असा असे पाटील म्हणाले.
विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीबाबत ते म्हणाले, हा संवाद आता किमान विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीत दिसावा. भास्कर जाधव यांचे नाव आम्ही दिले आहे. ती खुर्ची जास्त वेळ रिकामी ठेवली तर अण्णा बनसोडे यांना करमणार नाही. बेटावर बसल्यासारखी त्यांची परिस्थिती होईल, अशी मिश्कील टिप्पणी पाटील यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की, जेव्हा अध्यक्ष सांगतील, तेव्हा ही निवडणूक होईल, याची आठवण पाटील यांनी अध्यक्षांना करून दिली.
आपल्या (अध्यक्ष) मनात असेल तर आपण ते आजच जाहीर केलं तर आपल्याही मनाचा मोठेपणा किती विशाल आहे, हे दिसेल, असे पाटील म्हणाले. त्यावर नार्वेकर यांनी माझे मनपरिवर्तन करायचा चांगला प्रयत्न भास्कररावांनी केला आहे, असे सांगितले. हा शेवटचा प्रयत्न म्हणून काहीतरी करावंच लागतं. तो प्रयत्न आपण समजावा, असे उत्तर पाटील यांनी लगेच दिले.
पाटील यांनी पुन्हा भास्कर जाधव यांच्यासाठी नार्वेकरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. आपण मोठ्या मनाने, विशाल मनाने, भास्कररावांसाठी आजच सभागृह संपण्याआधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्या. आजच निर्णय घेतला तर राज्यघटनेवर चर्चा करताना घटना आपण तंतोतंत पाळायला तयार आहोत, हे कृतीतून तुम्ही दाखवून द्यावे, अशी विनंती जयंत पाटील यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.