Delimitation Bill : लोकसभा मतदारसंघ फेररचना घटनादुरुस्ती विधेयकाच्या मसुद्याला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आली आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. हे विधेयक ३० डिसेंबर रोजी लोकसभेत तर, २ डिसेंबर रोजी राज्यसभेत मांडले जाणार असून त्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे.
मात्र, या सर्व घडामोडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून मोठा गदारोळ सुरू झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत पाठिंबा देण्यासाठी चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. तर पवारांच्या राष्ट्रवादीने या विधेयकाला पाठिंबा दिल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशन विधेयकाला पक्षाचा पाठिंबा असल्याचे विधान केल्यानंतर आता पक्षाचे खासदार अमर काळे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आव्हाड यांनी पक्षाचा निर्णय झाल्याचे कोणत्या आधारावर सांगितले, याची आपल्याला कल्पना नसल्याचे काळे यांनी म्हटले आहे. तसेच, डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा, याबाबत पक्षात अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमर काळे यांनी माध्यमांशी बोलताना पक्षातील सध्याची स्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले की, डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर पक्षाच्या पातळीवर अद्याप सविस्तर चर्चा झालेली नाही. संसदेत या विधेयकावर मतदान करायचे असले, तरी त्यासंदर्भात खासदारांना पक्षाकडून कोणतेही स्पष्ट निर्देश मिळालेले नाहीत. त्यामुळे आव्हाड यांनी नेमक्या कोणत्या आधारावर पक्षाचा निर्णय जाहीर केला, हे सांगता येणार नाही.
काळे यांनी यावेळी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुष्काळविषयक बैठकीचाही संदर्भ दिला. या बैठकीत डिलिमिटेशनच्या विषयावर अवघ्या पाच मिनिटांची चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी जिल्ह्याचा खासदार म्हणून या प्रक्रियेबाबत स्वतःची भूमिका वरिष्ठ नेत्यांसमोर मांडली होती. मात्र, त्यानंतर या विषयावर पक्षात कोणतीही स्वतंत्र बैठक झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं होतं?
डिलिमिटेशन विधेयकाचा मसुदा समोर आल्यानंतर त्याचा सविस्तर अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सुप्रिया सुळे यांनी त्यावेळी सांगितल्याचे अमर काळे यांनी स्पष्ट केले. विधेयकात नेमक्या कोणत्या तरतुदी आहेत, हे तपासल्यानंतरच पक्षाची भूमिका ठरवली जाणार होती. मात्र, अद्याप विधेयकाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात मतदान करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्याशी झालेल्या अनौपचारिक चर्चेचा दाखला देत डिलिमिटेशन ही घटनात्मक प्रक्रिया असल्याने ती करावीच लागते, अशी पवारांची भूमिका असल्याचे म्हटले होते. पवारसाहेबांची जी भूमिका असेल, तीच आपली भूमिका असेल, असेही आव्हाड यांनी सांगितले होते.
मात्र, अमर काळे यांच्या प्रतिक्रियेमुळे पक्षाच्या अधिकृत भूमिकेबाबत नवा प्रश्न निर्माण झाला आहे. दिल्लीमध्ये गेल्यानंतर या विषयावर पक्षाची बैठक होण्याची शक्यता असून, त्यानंतरच अंतिम भूमिका स्पष्ट होईल, असे काळे यांनी सांगितले. त्यामुळे आव्हाडांच्या दाव्यानंतर आता पक्षातील इतर खासदार आणि वरिष्ठ नेत्यांची भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.