Maharashtra Budget 2023 Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget : फडणवीसांची मोठी घोषणा : मुलींना ७५ हजार रुपये; जनआरोग्य योजनेत पाच लाखापर्यंत खर्च

Maharashtra Budget Session : आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद, तर मुलींसाठी नवीन योजना

सरकारनमा ब्यूरो

Maharashtra Budget News : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा वार्षिक दीड लाखांवरून पाच लाख रुपये होणार आहे. नव्या २०० रुग्णालयांचा यात समावेश होणार आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या दरात अडीच लाख रुपयांवरून ४ लाख इतकी वाढ करण्यात आली आहे, अशी मोठी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस मांडत आहेत. त्यांनी अर्थ संकल्पात अनेक घोषणा केल्या आहेत. तसचे मुंबईच्या धर्तीवर संपूर्ण राज्यात बाळासाहेब ठाकरे यांच्यानावे ७०० आपला दवाखाना सुरू केले जाणार आहेत. त्यात विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा व उपचार करण्यात येणार आहेत. सर्वाजनीक आरोग्य विभागासाठी अर्थ संकल्पात ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महिला आदिवासी या सर्व घटकांचा विकासासाठी अनेक योजना फडणवीस यांनी जाहिर केल्या. राष्ट्राची प्रगती महिला सक्षमीकरणातून केली जाते. त्यासाठी चौथे महिला सक्षमीकरण धोरण जाहीर करण्यात येणार आहे. लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, चौथीत ४ हजार रुपये, सहावीत ६ हजार रुपये, आठवीत ८ हजार रुपये तर १८ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला ७५ हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत.

बस प्रवासात महिलांना ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात सरसकट ५० टक्के सूट महिलांना मिळणार आहेत. तसेच खरेदीदाराला स्टॅम्प ड्टीमध्ये एक टक्का सवलत दिली जाणार आहे. १५ वर्षांपर्यंत महिलेला पुरूष घटकास विक्री करता येत नाही ती अट आता शिथिल करण्यात येणार आहे.

अंगणवाडी सेविका व आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. ८१ हजार आशा स्वयंसेविका व साडेतीन हजार गटप्रवर्तक कार्यरत आहे. आशा सेविकांसाठी ३ हजार ५०० तर गटप्रवर्तकांचे मासिक मानधन ४ हजार रुपये इतके आहे. त्यात प्रत्येकी दीड हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन ८ हजार ३२५ रुपयांवरून १० हजार रुपये करण्यात आले आहे. तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५ हजार ९७५ वरून ७२०० आणि अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ४ हजार ४२५ वरून ५ हजार ५२५ रुपये करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT