Devendra Fadnavis News Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : मैदानासाठी संघर्ष कशाला? कडूंवर तिखट वार करताना फडणवीसांना सांगितला 'हा' नियम...

Lok Sabha Election 2024 : भाजप सत्तेचा वापर करून अमरावतीचे सायन्स स्कोअर मैदान ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

Chetan Zadpe

Mumbai News : अमरावतीत प्रचारसभेच्या मैदानवारुन चांगलेच राजकीय नाट्य घडून आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेसाठी भाजपने पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. प्रहार पक्षाने पहिल्यांदा मैदानासाठी बुकींग केली आहे, त्याचे पैसे भरले आहेत. सभेसाठी प्रहारला रीतसर परवानगीही मिळाली आहे, अशा वेळी भाजपच्या अमित शाह यांच्यासाठी सभा देणे हे आपल्यावर होणारे अन्याय आहे, असे म्हणत बच्चू कडू यांची पोलिस प्रशासनाशी बाचाबाची केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडूंना सामंजस्यपणाची भूमिका घेण्याची विनंती केली आहे. (Lok Sabha Election 2024)

फडणवीस म्हणाले, "शेवटी आम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आम्ही राजकीय विरोधक आहोत. तसे तर बच्चू कडू आमच्याकडेच आहेत, पण आता त्यांनी थोडीशी विरोधी भूमिका घेतली आहे. आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. त्यामुळे राज्याची प्रतिमा खराब होईल, अशी भूमिका कुणीच घेऊ नये. यापूर्वी एकदा अमरावतीत राहुल गांधींची सभा होती, तेव्हा आम्ही मैदान बुक केलं होतं, त्यावेळी आम्ही मैदान सोडून दिलं. मागे एकदा रवी राणांनी हॉल बुक केलं होतं, तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सभा झाली, तेव्हाही आम्ही राष्ट्रीय नेते येतात म्हणून बुकींग सोडून दिलं."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडणवीस पुढे म्हणाले, "याबाबत निवडणूक आयोगाचे नियम देखील आहेत. राष्ट्रीय नेत्यांना सभेसाठी प्राधान्य मिळतो. हे नियम अशासाठी आहे की, कुठलाही पक्ष चार पाच दिवसांची बुकींग करेल आणि दुसऱ्यासाठी जागाच देणार नाही. त्यामुळे मला वाटतं की, अशा प्रकारची भूमिका कडूंनी घेऊ नये. मी देखील त्यांना विनंती केली आहे की, अशा प्रकारची भूमिका घेऊ नका. अशा गोष्टींवर कशाला संघर्ष करायचा? सभा आणि मैदानाच्या कारणावरुन संघर्ष करणे योग्य नाही. देशाचे गृहमंत्री येत असताना त्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी."

काय आहे प्रकरण?

गृहमंत्री अमित शाह यांची सभा घ्यायचीच असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले, तर भाजप सत्तेचा वापर करून अमरावतीचे सायन्स स्कोअर मैदान ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. त्यांनी प्रहारची 24 एप्रिल रोजी सायन्स स्कोअर मैदानावर सभा होईल, असे स्पष्ट करत 23 एप्रिलपासून आम्ही ते मैदान ताब्यात घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

यासाठीची प्रहारने बुकिंग केली आहे. मैदानासाठी आम्ही 18 तारखेला पैसे भरले. याचा पुरावाही कडू यांनी दाखवला. प्रशासनातील अधिकारी प्रहारच्या कार्यकर्त्यांना फोन करत धमकावित आहेत. लोकसभा निवडणूक सुरू असताना निःपक्षपणे प्रशासनाने काम करण्याची गरज आहे. पण, तसे होत नाही. याचे परिणाम गंभीर असतील, असेही बच्चू कडू (Bachchu kadu) यांनी स्पष्ट केले.

पोलिसांची भूमिका काय?

अमित शाह (Amit Shah) यांची 24 एप्रिल रोजी अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी सभा होत आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडू यांची सभा रद्द करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT