Mumbai News, 24 Dec : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा केली. ही युतीची घोषणा करताना दोन्ही ठाकरे बंधुंनी भाजपवर आपल्या शैलीत टीका केली.
ठाकरेंच्या युतीची चर्चा राज्यभरात सुरू असातनाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांनी ठाकरे बंधुंच्या युती संदर्भात प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, 'या युतीमुळे राजकीयदृष्ट्या फार काही घडेल असा समज असेल तर तो बाळबोध समज आहे.
ज्या पक्षांना निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी लढावं लागतंय, त्या दोन पक्षांनी केलेली ही युती आहे. त्यामुळे याने फार काही परिणाम होईल असं मला वाटत नाही, अशा शब्दात त्यांनी दोन्ही ठाकरे बंधुंना टोला लगावला. शिवाय ठाकरेंनी कायम मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे, मराठी माणसाला मुंबईतून बाहेर घालवण्याचं पाप यांनी केलं आहे.
शिवाय अमराठी लोकांवर यांनी हल्ले केले, त्यामुळे आता मुंबईत यांच्यासोबत कोणीच नाही. यांचं रेकॉर्ड केवळं स्वहित आणि भ्रष्टाचाराचं आहे. तसंच निवडणुका आल्या की भावनिक बोलायचं हे यांचं नेहमीचं आहे. पण आता याला जनता भुलणार नाही. निश्चितपणे या निवडणुकीत आणखी दोनचार लोकं सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीचं काम बघून महायुतीला कैल देतील, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
तर आजच्या पत्रकार परिषदेची तयारी आणि चर्चा पाहता खोदा पहाड और चुहा बी नही निकला, अशी परिस्थिती आहे, अशी टीकाही फडणवीसांनी केली. तसंच यावेळी त्यांनी मी पु्न्हा एकदा सांगतो मुंबई म्हणजे ते नाहीत ते मराठी म्हणजे ते नाहीत, आणि आम्हीच सर्वकाही आहे हा जो त्यांचा गर्व आहे. त्यामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून लांब गेलेत. मुंबईकरांना सेवेकरी पाहिजेत स्वत:चा फायदा बघणारे नको आहेत, असं ते म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ माझ्याकडे आहे, असं म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत. आजकाल कसलेही व्हिडिओ बनवता येतात. पण मी एक गोष्ट सांगतो, अख्या दुनियेला माहितीय की देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला आहे आणि मरेल हिंदुत्ववादी म्हणून.
पण फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाही. मतांसाठी मत बदलणारे आम्ही नाही, आम्ही कालही हिंदूत्ववादी होतो आजही हिंदूत्ववादी आहोत आणि पुढेही हिंदूत्ववादी राहू, आमचं हिंदूत्व जनतेने पाहिलंय आणि ते त्यांना मान्य आहे.', अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंच्या युतीवर भाष्य केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.