

Thackeray alliance impact : ठाकरे बंधूंची युती नेमकी कुठपर्यंत असणार, ती फक्त मुंबईपुरती की संपूर्ण महाराष्ट्रासाठी, याबाबत गेले अनेक दिवस राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर आज 24 डिसेंबर रोजी या चर्चांना पूर्णविराम मिळाला. मुंबईतील वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा केली.
या युतीमुळे मुंबईसह राज्यातील सात महानगरपालिकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मराठी मतांचे एकत्रीकरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घोषणेकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे आणि समर्थकांचे लक्ष लागले होते.
जागा वाटपाबाबत नेमकं गणित काय असेल, यावर बोलताना राज ठाकरे यांनी थेट आकडे सांगण्यास नकार दिला. "कोण किती जागा लढवणार, आकडा काय.. हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुले पळवणाऱ्याच्या टोळ्या फिरताता. त्यामध्ये दोन टोळ्या अॅड झाल्या आहेत. ते राजकीय पक्षातील मुले पळवतात. ते उमेदवाराला पळवातात. असल्याची टीकाही त्यांनी केली. शिवसेना-मनसेच्या दोन्ही पक्षातील उमेदवारांना अर्ज कधी भरायचा, हे सांगितले जाईल आणि योग्य वेळी निर्णय जाहीर केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून महाराष्ट्र आणि मुंबईवर प्रेम करणाऱ्यांना आवाहन केले. मराठी अस्मिता जपण्यासाठी आमच्या पाठीशी उभे रहा, असे त्यांनी सांगितले. तसेच मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो आमच्याच विचारांचा असेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या युतीमागची भावना स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. या विचारातूनच दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. पत्रकार परिषद होण्याआधी राज आणि उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते, यामुळे या युतीला भावनिक अधिष्ठान मिळाले.
उद्धव ठाकरे यांनीही यावेळी आक्रमक भूमिका मांडली. भाजप मुंबई आणि महाराष्ट्रावर डोळा ठेवून असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही भांडत राहिलो तर संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा अपमान होईल, असे ते म्हणाले. त्यामुळे कर्तव्य म्हणून आम्ही एकत्र आलो असून ही युती टिकवण्यासाठीच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठी माणसाने आता चुकीचा निर्णय घेतला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.