Sangram Thopte-Satyajeet Tambe-Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Fadnavis Offer To Thopte : संग्राम थोपटेंसाठी फडणवीसांची ‘सत्यजित तांबे लाईन’; म्हणाले, ‘नाही तर आम्हाला न्याय द्यावा लागेल’

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra News : ‘शेवटी ज्याला कुठे न्याय मिळत नाही, त्याला आम्हाला न्याय द्यावा लागतो. आता तुम्ही (काँग्रेस) ठरवा, न्याय द्यायचा की नाही,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना हुलकावणी देणाऱ्या पदांबाबत भाष्य केले. तसेच, थोपटे यांना भाजप प्रवेशासाठी दरवाजे खुले असल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे ऑफर दिली आहे. (Devendra Fadnavis' 'Satyajit Tambe Line' for Sangram Thopte)

दरम्यान, विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अगोदर एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे अशाच आशयाचे विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमोरच सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यासारख्या कर्तृत्ववान कार्यकर्त्याला जास्त दिवस बाहेर ठेवता येत नाही. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर आमची नजर त्यांच्याकडे जाते,’ असे म्हटले हेाते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत तांबे यांनी काँग्रेसऐवजी (काँग्रेस नेते एबी फार्म दिल्याचे त्यावेळी सांगत होते, तर काँग्रेसकडून एबी फार्मच मिळाला नसल्याचा दावा तांबे कुटुंबीयांकडून आजही केला जातो) अपक्ष निवडणूक लढवली हेाती. तशीच चाल आता फडणवीस यांनी संग्राम थोपटे (Sangram thopte) यांच्याबाबत खेळली आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची आज विधानसभेत अधिकृतपणे विरोधी पक्षनेतेपदावरील नियुक्तीची घोषणा झाली. वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना फडणवीस यांनी थोपटे यांना काँग्रेसकडून डावलण्यात येत असल्याबाबत भाष्य केले.

फडणवीस म्हणाले की, नाना पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडलं. त्यावेळी आम्ही शेवटपर्यंत ऐकत हेातो. विधानसभेचे अध्यक्ष संग्राम थोपटे होणार... संग्राम यांचे नाव येणार... संग्रामभाऊंची चिठ्ठी झालीयं... चिठ्ठी निघालीयं... चिठ्ठीवर सही झालीयं....चिठ्ठी दिल्लीवरून सुटलीयं.... पण त्यांच्या नावाची चिठ्ठी डिस्पॅच होता होता कुठे अडते, हे कळतं नाही. (त्यावेळी विरोधी बाकावरून एक कमेंट झाली, त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हात करत त्यांना तिकडे काय. तुमच्या पक्षाचं ते थोडं ठरवतात.) ते तुमच्या पक्षाचं ठरवत नाहीत.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पदासाठी भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव चर्चेत आले होते. शेवटपर्यंत विधानसभा अध्यक्षांची निवड होऊ शकली नाही. पण, राज्यात सत्ताबदल झाला. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेतेपदासाठी थोपटे यांचे नाव पुढे आले होते. तसेच, त्यांनी काही आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे, अशा आशयाचे पत्र पक्षश्रेष्ठींना पाठविल्याचे सांगण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT