Devendra Fadnavis, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Fadnavis Vs Pawar : पवारांनी सज्जड दम भरल्यानंतर शेळकेंच्या मदतीला धावून आले फडणवीस; म्हणाले...

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना धमक्या देतात, असा आरोप करण्यात येत आहे. यावर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आमदार शेळकेंना, नीट वाग नाही, तर शरद पवार म्हणतात मला. मी त्या रस्त्याने कधी जात नाही. जर त्या रस्त्याने जाण्याची स्थिती निर्माण केली, तर मी कोणाला सोडत नाही, अशा शेलक्या शब्दांत दम भरला, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांना टोला लगावला आहे.

वीज कर्मचारी संघटनेशी चर्चा केल्यानंतर फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांना पवार-शेळकेंत झालेल्या खडाखडीवर छेडले. यावर फडणवीस म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) राजकारणात 55 वर्षांहून काळ आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याने एका साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर ते योग्य नाही. त्यांना मी काही सल्ला देऊ शकत नाही. मात्र, त्यांनी विधानाचा पुनर्विचार करावा. ते खूप मोठ्या उंचीवर आहेत, याचा त्यांनी विचार करावा. ते अशा प्रकारे कुठल्या आमदाराला धमक्या देऊ लागले तर त्यांचा स्तर खाली येईल. आणि मला वाटत नाही की कुठला आमदार त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देईल. त्यांचे म्हणणे मला योग्य वाटले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचीही माहिती फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिली. ते म्हणाले, वीज कर्मचाऱ्यांना साडेचौदाशे कोटींची वेतनवाढ देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही काही मोठे निर्णय झालेले आहेत. आता आपल्याला साडेसात रुपयांऐवजी 2 रुपये 87 पैसे ते 3 रुपये 10 पैसे या दराने दिवसा वीज मिळणार आहे. ही प्रक्रिया 11 महिन्यांत केली असून, पुढील 18 महिने काम पूर्ण करण्यास दिले आहेत.

देशात महाराष्ट्र पहिले असे राज्य होईल जेथे शेतकऱ्यांना सोलरवर वीज मिळणार असल्याचा दावाही फडणवीसांनी केला. त्यांनी सांगितले, आता एकूण कृषी फीडरपैकी 50 टक्के फीडर सोलराइज होतील. त्याची दुसरी फेज सुरू करतोय, उरलेल्या 50 टक्के फीडरसाठी टेंडर काढतोय. त्यामुळे देशात आपले राज्य 100 टक्के कृषी वीजनिर्मिती सोलरवर होणार आहे. त्यामुळे आपली कोस्ट वाचणार आहे. सध्या महावितरण कंपनी तोट्यात असून, आता तिच्या जोडील अॅग्री सोलर कंपनी आहे. त्यामुळे आताच्या रेटच्या आधारावर पुढाच्या तीन ते चार वर्षांत महावितरणला नवरत्न कंपनीत आणण्याचा प्रयत्न असेल, असा दावाही फडणवीसांनी केला. (Latest Political News)

आजच्या निर्णयामुळे 40 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून 40 हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आता राज्यातील लिफ्ट इरिगेशन स्किम्सही सोलरवर आणणार आहोत. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न असणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर त्याबाबत टेंडर काढणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांना शाश्वत आणि कायमस्वरूपी वीज मिळणार आहे. आता एका वर्षातच आठ लाख सोलरपंप देण्यात येणार आहेत. त्यामुळे मागेल त्याला सोलरपंप मिळेल, असा शब्दही फडणवीसांनी दिला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT