Devendra Fadnavis & Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray : 'ठाकरेंसोबत टोकाचे मतभेद, पुन्हा एकत्र...'; प्रसाद लाडांनी उद्धव यांंच्यासोबतच्या 'त्या' फोनच्या चर्चेचं वृत्त फेटाळलं

Deepak Kulkarni

Mumbai News : महाराष्ट्राच्या एक्झिट पोलच्या आकड्यानंतर भाजपने थेट जुना मित्र असलेल्या उद्धव ठाकरेंसोबत जवळीक करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत का अशी शंका उपस्थित व्हावी अशी बातमी समोर आली. अन् राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

एक्झिट पोलच्या आकड्यांनी देशात भाजपच्या पदरात भरभरुन मतांचं दान टाकल्याचे दिसून येत आहे. पण महाराष्ट्रात महायुतीला फटका अन् उद्धव ठाकरेंचे पारडे जड दाखवल्याने भाजप नेतृत्वाचे डोळे खाडकन् उघडले असावेत. त्यातूनच उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचा चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील प्रसाद लाडांच्या माध्यमातून ठाकरेंना फोन केल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती.

महाराष्ट्रात फडणवीस आणि पर्यायाने महाशक्तीतीला माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पुरून उरणार असल्याचे आकडे ‘एक्झिट पोल’ ने दाखवून दिले. म्हणजे, सत्ता ओढून नेली, शिवसेनेचे नाव गेले, चिन्ह नेले, आमदार पळवले, उरलेल्यांच्या चौकशा केल्या. तरीही, ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात झंझावाती प्रचार केला.या निवडणुकीत ठाकरे भारी ठरणार असल्याचे दिसताच त्यांच्याशी पुन्हा घरोबा करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा पुढे आली.

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी सोमवारी (ता.3) माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे पुढे आल्याने राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला आहे. या फोनमध्ये उद्याच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे सायंकाळी वेळ मागितली असल्याचे बोलले जात आहे. पण एकीकडे महायुतीचे समन्वयक असलेल्या प्रसाद लाड यांनी ठाकरेंना फोन केल्याचे वृत्त फेटाळले आहे. त्यांनी ठाकरेंसोबत आमचे टोकाचे मतभेद असल्याचे स्पष्ट करत पुन्हा त्यांच्यासोबत एकत्र येणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत फोनच्या चर्चांना लाड यांनी पूर्णविराम दिला.

'साम' वृत्तवाहिनी आणि 'सरकारनामा' यासंबंधीचे सर्वात आधी बातमी दिल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे भाजप आमदार प्रसाद लाड यांंनी सरकारनामाशी संपर्क करत आपली बाजू मांडली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरे कधीही एकत्रित येण्याची शक्यता नाही. देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंची यापूर्वीही गरज नव्हती, आजही नाही आणि भविष्यातही नसणार असंही लाड यांनी स्पष्ट केले.

"ना आम्हाला उद्धव ठाकरेंची गरज होती.."

प्रसाद लाड म्हणाले, “मीडियामध्ये ज्या पद्धतीने अशा प्रकारचं पर्सेप्शन निर्माण केलं गेलं की, आम्ही उद्धव ठाकरेंना फोन करुन भेटीची वेळ मागितली, ही अतिशय धांदात खोटी आणि चुकीची माहिती पसरवल्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोप करत त्यांनी केला आहे. ना आम्हाला उद्धव ठाकरेंची गरज होती, ना आहे आणि ना भविष्यात कधी लागेल. निश्चितपणे कुणीतरी पर्सेप्शन करण्यासाठी ही माहिती पसरवली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

महाविकास आघाडीचा पराभव पूर्णपणे दिसतोय. मोदी सरकार पुन्हा येणार ते दिसतंय. महाराष्ट्रातला महायुतीचा विजय समोर दिसायला लागलाय. त्यामुळे खोट्या बातम्या पसरवण्याचं काम चालू आहे. त्याचा मी निषेध करत आहे, असा खुलासाही लाड यांनी ठाकरेंना फोन केल्याची चर्चांवर केला आहे.

मुंबईतील सहा लोकसभा जागांसाठी 20 मे रोजी मतदान पार पडले.पण हे मतदान सुरू असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आचारसंहितेचा भंग करत सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेतली होती.ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने आता उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात तपास करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत मंद गतीने चालणारी मतदान प्रक्रिया,वगळलेली नावे या सगळ्यांमुळे त्यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला होता.या नंतर निवडणूक आयोगाकडे आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने कारवाईला सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT