Ranjitsinh Mohite Patil : माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील खासदार होणार...रणजितदादा फडणवीसांची साथ सोडणार?

Lok Sabha Election 2024 : भाजपचे आमदार असूनही रणजितसिंह मोहिते पाटील हे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारापासून लांब राहिले. ती एक तडजोड होती. मात्र निवडणुकीनंतरही त्यांनी निंबाळकर यांच्या विरोधातील भूमिका कायम ठेवल्याचे त्यांच्या फलटणमधील आंदोलनातून स्पष्ट झाले.
Ranjitsinh Mohite Patil
Ranjitsinh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 03 June : माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यात सर्वाधिक चर्चेची ठरली. भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीची घोषणा, मोहिते पाटील यांचे बंड...गिरीश महाजन यांची अकलूजवारी...पवार-शिंदे यांची ‘शिवरत्न’वर लंच डिप्लोमसी अशा अनेक राजकीय घडामोडी गेल्या दोन महिन्यांत घडल्या.

सर्वाधिक महत्वाची घडामोड म्हणजे भाजपचे आमदार असूनही रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) हे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारापासून लांब राहिले. ती एक तडजोड होती. मात्र निवडणुकीनंतरही त्यांनी निंबाळकर यांच्या विरोधातील भूमिका कायम ठेवल्याचे त्यांच्या फलटणमधील आंदोलनातून स्पष्ट झाले. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर रणजितसिंह मोहिते पाटील नवा राजकीय झेंडा हाती घेणार की भाजपसोबत (BJP) राहण्याची भूमिका कायम ठेवणार, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha loksabha Constituency) भाजपच्या उमेदवारीसाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छूक होते. मात्र, भाजपने मोहिते पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar) यांची उमेदवारी १३ मार्चच्या पहिल्या यादीत जाहीर केली. मोहिते पाटील बंड करणार नाहीत, असा कयास भाजप नेत्यांचा होता. मात्र, मोहिते पाटलांनी तो दबाव झुगारून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली.

भाजपने निंबाळकारांची उमेदवारी पहिल्याच यादीत जाहीर केल्याने मोहिते पाटील यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला. मिळालेल्या वेळेत माेहिते पाटील यांनी दोन वेळा माढा मतदारसंघाची प्रचार फेरी केली. मतदारसंघात बांधणी करणे त्यांना सोपे गेले. कदाचित माढ्याची उमेदवारी उशिरा जाहीर झाली असती तर चित्र वेगळे दिसले असते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहिते पाटलांची मनधरणी करण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अकलूजमध्ये हजेरी लावली. त्या वेळी त्यांना घेण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील गेले होते. मात्र, महाजनांच्या भेटीनंतर मोहिते पाटील यांची नाराजी दूर होऊ शकली नाही. त्यानंतर मुंबईत शरद पवार यांची मोहिते पाटील यांनी भेट घेतली.

दरम्यानच्या काळात स्वतः रणजितसिंह मोहिते पाटील यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क होता. मात्र, मार्ग निघत नसल्याने अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय एकट्या धैर्यशील यांनी घेतला नाही तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून कुटुंबातील लहान थोर सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.

माढ्यातून निवडणूक लढवायची म्हटल्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजप उमेदवाराच्या प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. निंबाळकरांच्या एका प्रचाराच्या सभेला त्यांनी हजेरी लावली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकलूजमध्ये जाहीर सभा झाला, त्या सभेकडेही ते फिरकले नाहीत. त्या सभेला येत असताना रणजितसिंह मोहिते पाटील हे स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उभे होते. मात्र, फडणवीस ते स्वागत न स्वीकारता निघून गेले. त्यामुळे भाजपचे आमदार असूनही ते ना स्टेजवर गेले ना फडणवीसांचा सत्कार करू शकले.

Ranjitsinh Mohite Patil
Solapur, Madha Lok Sabha Result : सोलापूर, माढ्याचा निकाल दुपारी तीनपर्यंत हाती येणार; पोस्टल मतदान अगोदर मोजणार

खरं तर रणजितदादाही संपूर्ण कुटुंबाच्या निर्णयासोबत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण पुढे अनेक राजकीय डावपेच आखले गेले. त्यावर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची छाप असल्याचे स्पष्ट होते. मात्र, उघडपणे राष्ट्रवादीच्या स्टेजवर जाणे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शेवटपर्यंत टाळले. मात्र, मतदान झाल्यानंतर माळशिरस, सांगोला आणि पंढरपूरचे पाणी बंद झाले. त्यावरून निंबाळकर यांच्यावर आरोप करत फलटणमध्ये मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे मतदानानंतर त्यांनी निंबाळकर विरोध कायम ठेवल्याचे दिसून आले.

मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रत्यक्ष निकाल उद्या जाहीर होणार आहेत. त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे. धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले तर कदाचित रणजितदादांना भाजप आमदारकीचा राजीनामा द्यायला भाग पाडू शकते, अशी एक चर्चा सुरू आहे. पराभव झाला तर त्यांना भाजपसोबत राहण्याशिवाय गत्यंतर नसणार आहे. पण, भाजपकडून काय भूमिका घेतली जाते, हेही पाहावे लागणार आहे.

Ranjitsinh Mohite Patil
Solapur, Madha Vote counting : मतमोजणी केंद्रासह सोलापुरात 2000 पोलिसांचा बंदोबस्त; रामवाडी गोदाम परिसरात जमावबंदी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com