DGIPR Controversial Tweet: देशाचा स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र सरकारनं पुन्हा एकदा 'हर घर तिरंगा' कॅम्पेन सुरु केलं आहे. राज्य सरकारकडूनही या मोहिमेचा प्रचार केला जात आहे. या मोहिमेतून जनतेला स्वतंत्र्यदिन उत्साहत साजरा करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. राज्य शासनाच्या प्रचार यंत्रणनेनं अर्थात माहिती व जनसंपर्क संचालनालयानं (DGIPR) या मोहिमेच्या प्रचारासाठी नुकतंच ट्विट केलं आणि देशभक्तीचे प्रकार सांगितले तसंच तुम्ही कुठल्या प्रकारचे देशभक्त आहात असा सवालही जनतेला विचारला आहे. त्यामुळं DGIPR ला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. स्वातंत्र्यदिनाचा प्रचार ठीक आहे, पण जनतेला तुम्ही कोणत्या प्रकारचे देशभक्त? असा सवाल विचारणं योग्य नसल्याचं म्हटलं जात आहे.
हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं जनतेला आपल्या शर्टवर छोटा तिरंगा ध्वज लावण्याचं तसंच घरांवर तिरंगा झेंडा फडकवण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी विशेष ग्राफिक्सही सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आले आहेत. या ग्राफिक्सवर 'अशा दोन प्रकारचे लोक असतात' असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. हेच ग्राफिक्स आणि कॅप्शन DGIPR नं आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केलं आहे. पण यामध्ये त्यांनी तुम्ही कुठल्या प्रकारचे देशभक्त आहात? तुमची तिरंगा लावण्याची स्टाईल कशी आहे? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.
एकतर देशात काही लोकांकडून अधुनमधून देशभक्तीची सर्टिफिकेट्स वाटली जातात. म्हणजेच सरकारविरोधात भाष्य केल्यास देशातील नागरिकांच्या राष्ट्रप्रेमावर शंका उपस्थित केल्या जातात. यावरुन नेहमीच राजकीय टीका-टिपण्या सुरु असतात. यामध्ये देशभक्ती केवळ तिरंगा ध्वज लावण्यातूनच व्यक्त होत नाही. तर ती देशातील संविधानाचा आदर करण्यातून, संविधानिक संस्था-यंत्रणांना मुक्त वातावरण उपलब्ध करुन देण्यातून होते.
तसंच संविधानाची मुलतत्व असलेल्या समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य या तत्वांना अनुसरुन वागणं. तसंच सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य आणि दर्जा व संधीची समानता त्याचबरोबर देशाची एकात्मता आणि बंधुता जपणं त्याचं पालन करणं म्हणजे खरी देशभक्ती अशी व्यापक व्याख्या करता येऊ शकते, अशा प्रकारच्या डिबेट सुरु असतात.
पण सरकारच्या प्रचार यंत्रणेनं केवळ तुम्ही तिरंगा कशा पद्धतीनं लावणार? तिरंगा लावण्याची तुमची स्टाईल कशी असेल? असं विचारणं म्हणजे तुम्ही त्या प्रकारचे देशभक्त आहात असं विचारणं संकुचित प्रकारचं असल्याच्या आशयाचं मत अनेक युजर्सनं DGIPRच्या ट्विटवर कमेंट करताना म्हटलं आहे. यामध्ये नटवर राठी नामक व्यक्तीनं म्हटलं की, "आम्ही तिरंगा हृदयाजवळ नव्हे, हृदयात बाळगतो. आम्ही देशभक्तीचा देखावा करत नाही तर देशभक्ती करतो. आता तुम्ही ठरावा तुम्ही दिखाऊ देशभक्त आहात की खरे".
तौफिक अन्सारी नामक युजरनं म्हटलं की, "मी दोन्ही प्रकारात येतो. तिरंगा हृदयाजवळही आणि उंच आकाशातही" तसंच शेख शहाजहाँ खजाबी फकीर या शिक्षकानं आपल्या देशभक्तीच्या कार्याच्या बातम्यांची काही कात्रणं जोडून "मी कोणत्या प्रकारात येतो हे आपण ठरवावे ही आपणांस नम्र विनंती" असा सवाल विचारला आहे. या कात्रणांमध्ये रॅलीजमध्ये आणि स्वातंत्र्यदिनी रस्त्यांवर पडलेले छोटे राष्ट्रध्वज गोळा करुन त्याचा सन्मान राखण्याचं आवाहन ते करतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.