Dia Mirza Video Row Sarkarnama
मुंबई

Dia Mirza BMC video controversy : दिया मिर्झाचा व्हिडिओ हटवणे 'BMC'ला भोवणार? भाजपची मुंबईत कोंडी! शिंदे शिवसेनेचे एकमत दिसेना, काँग्रेसनेही डागले राजकीय फटाके

Dia Mirza BMC Diwali campaign video sparks political row Eknath Shinde ShivSena backs actress, while Congress targets BJP over removal : अमित साटम यांच्या आक्षेपानंतर BMCने हटवलेला व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्याची मागणी; उपमहापौर संजय घाडींकडून दिया मिर्झांची पाठराखण, वर्षा गायकवाडांचा भाजपवर घणाघात!

Pradeep Pendhare

Mumbai BMC political controversy : अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या मुंबई महापालिकेने प्रदूषणमुक्त दिवाळी अभियानातील व्हिडिओवर भाजपने आक्षेप घेतल्यानंतर तो हटवण्यात आला. भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आमदार अमित साटम यांनी सुरवातील आक्षेप घेतला, त्यानंतर महापौर रितू तावडे यांनी थेट दिया मिर्झा यांना हिंदू विरोधी म्हटले. यावरून आता मुंबई महापालिकेत राजकीय फटाके फुटू लागले आहेत.

दिया मिर्झा यांचा व्हिडिओ पुन्हा 'BMC'ने अपलोड करावा यासाठी काँग्रेस, समाजवादी पार्टी, सामाजिक कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे शिवसेनेचे उपमहापौर संजय घाडी यांनी दिया मिर्झा यांची बाजू घेतल्याने भाजपची कोंडी झाली आहे. परंतु मुंबईतील नेते संजय निरूपम यांनी वेगळी भूमिका मांडल्याने, शिवसेनेच्या भूमिकेबाबत संभ्राम निर्माण झाला आहे.

मुंबई काँग्रेस (Congress) खासदार वर्षा गायकवाड यांनी, भाजप द्वेषाचे आणि धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे विकृत राजकारण करत आहे. सत्ताधाऱ्यांच्या भेदभावाच्या या भूमिकेला महापालिका आयुक्त म्हणून कारभार पाहणाऱ्या सनदी अधिकारी का दबावात आल्या, असा प्रश्न केला. भारतीय संविधानाचे पालन करण्याची त्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे समानता आणि धर्मनिरपेक्षतेच्या घटनात्मक मूल्यांचे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. अशा प्रकारच्या भेदभावपूर्ण कृतीची जबाबदारी निश्चित करून आयुक्तांना पदावरून तात्काळ हटवावे, अशी मागणीही वर्षा गायकवाड यांनी केली.

दिया मिर्झा यांनी प्रदूषणमुक्त दिवाळीचा सुंदर आणि सकारात्मक संदेश देणारा व्हिडिओ मुंबईकरांसाठी दिला होता. मात्र, इतर सेलिब्रिटींचे व्हिडिओ महापालिकेच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर कायम असताना केवळ दिया मिर्झा यांचाच व्हिडिओ भाजपच्या (BJP) दबावामुळे हटवला. हा दुजाभाव निश्चितच धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. धर्म कोणताही असो, प्रत्येक नागरिकाला संविधानानुसार समान वागणूक मिळालीच पाहिजे. महापालिका ही सर्व मुंबईकरांची व संविधानानुसार अस्तित्वात आलेली आहे. तिथे धर्माच्या आधारावर भेदभावाला अजिबात स्थान असू शकत नाही, असेही गायकवाड यांनी म्हटले.

भाजपचे संकुचित अन् विकृत राजकारण

मुंबई महापालिकेने दिया मिर्झा यांचा व्हिडिओ तातडीने पुन्हा प्रसारित करावा आणि त्यांची बिनशर्त जाहीर माफी मागावी. भाजपचे द्वेषाचे आणि धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे विकृत राजकारण मुंबईच्या मातीत कधीही रुजणार नाही. आम्ही दिया मिर्झा यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. मुंबई प्रत्येकाची आहे आणि ती प्रत्येकाचीच राहिली पाहिजे. मुंबईत असल्या संकुचित आणि विकृत राजकारणाला थारा असता कामा नये, असेही गायकवाड यांनी म्हटले.

उपमहापौर घाडींचा भाजपच्या भूमिकेला विरोध

मुंबई महापालिकेतील सत्तेत सहभागी असलेले एकनाथ शिंदे शिवसेनेने देखील दिया मिर्झा यांची पाठराखण केली आहे. उपमहापौर संजय घाडी यांनी, अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या आवाहनात काहीही चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने अभिनेत्रीचा संदेश हटवण्याची किंवा भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी त्याला विरोध करण्याची कोणतीही गरज नव्हती, असेही स्पष्ट केले.

बीएमसी भाजपचे पक्ष कार्यालय नाही

भिवंडीमधील आमदार रईस शेख यांनी, मुंबई महापालिका ही नागरी संस्था आहे, भाजपचे पक्ष कार्यालय नाही, असा टोला लगावला. महापालिकेच्या स्वतःच्या पोस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा उल्लेख करण्यात आला होता. मग केवळ दिया मिर्झा यांचाच व्हिडिओ का हटवण्यात आला आणि इतरांचे व्हिडिओ अजूनही कायम का आहेत? याबाबत मुंबई महापालिकेने मुंबईकरांना स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली.

धार्मिक हस्तक्षेपाचा अधिकार नाही : निरूपम

दिया मिर्झा यांनी दिवाळीसारख्या मंगलमय सणाच्या निमित्ताने फटाके फोडणे, दिवे लावणे आणि परिसर प्रकाशमान करण्याच्या आपल्या देशातील शतकानुशतकांच्या परंपरेविरोधात विधान केले आहे. हे निश्चितच आक्षेपार्ह आहे. दिया मिर्झा यांना आपल्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते संजय निरूपम यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT