Dia Mirza's BMC anti-pollution Diwali video sparked controversy Sarkarnama
मुंबई

Dia Mirza: 'UN' च्या अ‍ॅम्बेसिडर, याआधी महाराष्ट्र सरकार अन् 'BMC' च्या कार्यक्रमांना हजेरी; मग दिया मिर्झांच्या व्हिडिओवरून आताच वाद का? 3 महिन्यांपूर्वी काय घडलं?

BMC Diwali Campaign: अभिनेत्री आणि संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण सदिच्छादूत दिया मिर्झा; मुंबई महापालिकेच्या प्रदूषणमुक्त दिवाळी अभियानातील व्हिडिओवरून सध्या राजकीय वाद सुरू आहे.

सरकारनामा ब्यूरो

Dia Mirza Controversy News: अभिनेत्री दिया मिर्झा यांचा मुंबई महापालिकेच्या प्रदूषणमुक्त दिवाळी अभियानासाठी तयार करण्यात आलेला व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आमदार अमित साटम यांनी या व्हिडिओवर आक्षेप घेतल्यानंतर तो हटवण्यात आला. त्यानंतर महापौर रितू तावडे यांनीही दिया मिर्झा यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने या प्रकरणाची चर्चा अधिक वाढली. या भूमिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही आक्षेप घेतला आहे. मात्र, या वादाच्या निमित्ताने दिया मिर्झा यांच्या पर्यावरण क्षेत्रातील कामाची आणि यापूर्वी त्यांनी शासकीय उपक्रमांमध्ये बजावलेल्या भूमिकेचीही चर्चा सुरू झाली आहे.

दिया मिर्झा या केवळ अभिनेत्री किंवा निर्माती म्हणूनच ओळखल्या जात नाहीत, तर पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणासाठीही त्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांची भारतासाठी संयुक्त राष्ट्र पर्यावरण सदिच्छादूत (UN Environment Goodwill Ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांसाठीच्या (SDGs) अ‍ॅडव्होकेट म्हणूनही त्या काम करतात.

प्लास्टिक प्रदूषणाविरोधात संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेचे नेतृत्व

२०१८ मध्ये भारतात आयोजित जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर दिया मिर्झा यांनी संयुक्त राष्ट्रांच्या #BeatPlasticPollution या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि प्लास्टिक प्रदूषणाविषयी जनजागृती करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. पर्यावरण संवर्धनासाठी जनसहभाग वाढवण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे.

याशिवाय त्या वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या ‘क्लब नेचर’च्या संस्थापक सदस्य आणि संस्थेच्या सदिच्छादूत आहेत. ‘किड्स फॉर टायगर्स’ या व्याघ्रसंवर्धन मोहिमेची सदिच्छादूत, ‘सॅंक्च्युरी नेचर फाउंडेशन’च्या गव्हर्निंग बोर्डाच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’च्या ‘स्वच्छ साथी’ उपक्रमाशीही त्या जोडल्या गेल्या होत्या. ‘सेव्ह द चिल्ड्रन’च्या पहिल्या भारतीय सदिच्छादूत म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेच्या उपक्रमांमध्येही सहभाग

पर्यावरणविषयक कामाच्या निमित्ताने दिया मिर्झा यांनी यापूर्वी महाराष्ट्र शासन आणि मुंबई महापालिकेशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. वृक्षारोपण, वन्यजीव संरक्षण, प्लास्टिकचा वापर कमी करणे, घनकचरा व्यवस्थापन आणि किनारपट्टी स्वच्छता यांसारख्या विषयांवरील जनजागृती मोहिमांमध्ये त्यांची उपस्थिती राहिली आहे. शासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या पर्यावरणविषयक उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे.

त्यामुळे मुंबई महापालिकेच्या प्रदूषणमुक्त दिवाळी अभियानासाठी त्यांची निवड होणे, हे त्यांच्या पर्यावरणविषयक कामाच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात होते. मात्र, अभियानासाठी तयार केलेल्या व्हिडिओवर भाजपने आक्षेप घेतल्यानंतर हा विषय पर्यावरण जनजागृतीपुरता मर्यादित न राहता चर्चेचा विषय बनला. विशेष म्हणजे दिर्या मिर्झा यांच्याप्रमाणेच ज्येष्ठ अभिनेत्री माधुरी दीक्षित, निशिगंधा वाड, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनीही प्रदुषणमुक्त दिवाळीसाठी नागरिकांना आवाहन केले आहे.

मग आताच वाद का? तीन महिन्यांपूर्वी काय घडलं होतं?

दिया मिर्झा यांच्या अलीकडील काही सार्वजनिक भूमिकाही या वादाच्या संदर्भात चर्चेत येत आहेत. देशातील शिक्षण व्यवस्था, परीक्षांमधील अनियमितता आणि पारदर्शकतेच्या मागणीसाठी 'जेन झी'ने केलेल्या आंदोलनांना त्यांनी पाठिंबा दर्शवला होता. तसेच पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनालाही त्यांनी समर्थन दिले होते.

सोशल मीडियावर भूमिका मांडताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलन करण्याच्या अधिकाराचे समर्थन केले होते. 'मी या देशाच्या विद्यार्थ्यांसोबत उभी आहे आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकाराचे समर्थन करते,' अशा आशयाची भूमिका त्यांनी मांडली होती. तरुणांनी शांततापूर्ण मार्गाने आपले प्रश्न मांडल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले होते.

या पार्श्वभूमीवर त्यांच्या आंदोलनांना दिलेल्या पाठिंब्याचा आणि सध्याच्या व्हिडिओविरोधातील आक्षेपांचा काही संबंध आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या दोन्ही घटनांमध्ये थेट संबंध असल्याचे स्पष्ट करणारी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महापौर रितू तावडे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून दिया मिर्झा यांना विरोध केला आहे.

दिया मिर्झा यांच्या पर्यावरणविषयक कामाचा मोठा अनुभव, संयुक्त राष्ट्रांशी असलेले त्यांचे नाते आणि यापूर्वी शासकीय उपक्रमांमधील सहभाग या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या अभियानातील व्हिडिओवरून निर्माण झालेला वाद चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात संबंधितांकडून मांडण्यात येणाऱ्या भूमिका आणि पुढील घडामोडींकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT