Uddhav Thackeray, Devendra Fadnavis sarkarnma
मुंबई

Uddhav Thackeray: भाजपचा बडा मासा ठाकरे गटाच्या गळाला; आज मेगा भरती

Jui Jadhav

Mumbai: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होणार आहेत. शिवसेनेच्या हाताला यंदा भाजपचा बडा मासा गळाला लागला आहे. मुंबई भाजपचे माजी उपाध्यक्ष दिलीप माने यांचा आज बहुतांश कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश होणार आहे. त्यामुळे शिवसेनेत आज मेगा भरती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

शिवसेनेचे दोन गट झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट. या दोन्हीही पक्षात पक्षप्रवेश सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात अधिकतर माजी नगरसेवक हे ठाकरे गटाचे असतात. मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षात इतरही पक्षातील पदाधिकारी पक्षप्रवेश करताना दिसून येत आहेत. काही आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक महत्वाचा चेहरा संजय वाघेरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता भाजपचे मुंबई माजी उपाध्यक्ष यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशासोबत प्रामुख्याने बंजारा मातंग व चर्मकार समाजाचे असंख्य कार्यकर्ते व त्यांचसोबत मराठी चित्रपट क्षेत्रातील मंडळी, सेवानिवृत्त अधिकारीही पक्षप्रवेश करणार आहेत. यापूर्वी दिलीप माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबई उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष पदासोबतच प्रदेश सचिव मुंबई उपाध्यक्ष यासारख्या पदावर अनेक वर्ष काम केले असल्यामुळे त्यांचा राजकीय क्षेत्राचा मोठा अनुभव दिसून येत आहे. तसेच शिवसंग्राम संघटनेचे मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांनी विनायक मेटे सोबत ही अनेक वर्ष काम केले आहे. मराठवाडा विकास मंडळ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यातील मुंबई स्थित जनतेसाठी सामाजिक कार्यासोबतच आरोग्य, शैक्षणिक व इतर मदत मिळवून देण्या सोबत तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी सुद्धा कार्य केले आहे. सध्याच्या राजकीय गढूळ व अस्थिर वातावरणात उद्धव ठाकरे हे एक आश्वासक चेहरा वाटत असल्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्षात जास्तीत जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते असावेत अशी प्रत्येक पक्षाची भावना आहे. गेल्याच आठवड्यात मातोश्रीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. भाजप उत्तर मुंबई जिल्हा सचिव प्रदीप उपाध्याय, विश्व हिंदू परिषदेचे घनश्याम दुबे ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर प्रदिप उपाध्याय आणि घनश्याम दुबे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदेंच्या वाटेवर?

ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना ईडीच्या धमक्या दिल्या जात असल्याचा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्विटरवर याबाबतचा खळबळजनक दावा केला आहे. रवींद्र वायकर यांच्या पाठीमागे सध्या ईडी चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यांच्यावर जोगेश्वरीतील जमिनीच्या भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई सुरु आहे. ईडीने त्यांची आधी चौकशी देखील केली आहे. पण आता संजय राऊतांनी गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT